सिंधुदूर्ग:संपादकीय
दिनांक: ४ सप्टेंबर २०२४
सरकारने १३५ रुपये दराने काजू बी खरेदी केलेली घोषणा हवेतच विरली. तर अनुदानाच्या रकमेसाठी जाचक अटी शर्ती लावून सरकार गरीब शेतकऱ्यांना कोपराला गूळ लावून चाटण्यास सांगण्याचा केविलवाणा खेळ खेळत आहे. काजू मंडळ अध्यक्षांनी तर अनुदान प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४घोषित केली, परंतु अर्ज वितरण आणि जमा करण्याची यंत्रणा अस्तित्वात नाही. एकंदरीत सर्व प्रकार पाहता कोणाचा पायपोस कोणास नाही असे सांगत शेती काजू बागायतदारांची गणेश चतुर्थीच्या तोंडावर घोर फसवणूक केली आहे. आमदार, मंत्री महोदयांनी केवळ आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे एकंदरीत सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी आणि फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी केला आहे.
बांदा येथे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संघाचे पदाधिकारी बोलत होते. यावेळी दिवाकर म्हावळणकर, सुरेश गावडे, संजय देसाई, लक्ष्मण देसाई, भीमराव देसाई, नारायण गावडे, गुरुनाथ नाईक, विष्णू सावंत, जनार्दन नाईक, गोपाळ करमळकर, जगदेव गवस, विठ्ठल मोरुडकर, दीनानाथ कशाळकर, समीर सावंत आदी उपस्थित होते.
संजय देसाई म्हणाले की, जेव्हा १३५ रुपये काजू बी खरेदी आणि अनुदान म्हणून १० रुपये अशी घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. तेव्हा शेतकऱ्यांनी ७० टक्के काजू विनापावती आठवडा बाजारात त्यांच्या निकडीप्रमाणे विकला होता. परंतु घोषणा केलेला अध्यादेश ९ जुलैला प्रसिद्ध करण्यात आला तेव्हा कोणत्याही शेतकऱ्यांकडे १३५ रुपये प्रति किलो विकण्यास 10 किलो सुद्धा काजू न होता. तसेच अनुदान मिळण्यासाठी नमूद केलेल्या अटी शर्ती केवळ २०२४ च्या हंगामासाठी शिथील करून जे २७९ कोटी काजू बागायतदारांसाठी मंजूर झाले ते विनासायास गणेश चतुर्थीपर्यंत देण्याची मागणी दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. परंतु बघतो करूया असे आश्वासन देण्यापलीकडे कोणतीही कृती झाली नाही. सुरुवातीपासून ज्या ज्या नेते, लोकप्रतिनिधी, मंत्री यांना भेटलो त्या त्या प्रत्येकाची विधाने परस्पर विरोधी होती.
काजू मंडळ अध्यक्षांनी अनुदान प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४घोषित केली. परंतु मागणी अर्ज वितरण आणि जमा करण्याची यंत्रणात अस्तित्वात नाही. एकूण सर्व प्रकार पाहता कोणाचा पायपोस कोणास नाही. काजू बागायतदारांची ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर घोर फसवणूक केल्यासारखा प्रकार असल्याचा आरोप सुरेश गावडे यांनी केला आहे. तसेच निदान आता तरी संबंधितानी याची दखल घेऊन केलेल्या मागण्या व घोषणा कृतीस रुजू व्हावे अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी फळ बागायतदार संघाने दिला.
💐चतुर्थीत सर्व संघटनांची बैठक 💐
सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील शेती फळबागायतदार संबंधित सर्व संघटनांची एकत्र बैठक गणेश चतुर्थी काळात आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांच्या सहमतीने शेतकऱ्यांच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधणार महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची माहिती रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी दिली. त्यामुळे या बैठकीत कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.