न्हावेली प्रतिनिधि
दिनांक: ३ सप्टेंबर २०२४
न्हावेली गावात भारत सरकार मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत न्हावेली जोड रस्ता०/००/ते ३/०४० मध्ये खडीकरण करण्यात आले होते तयार झालेल्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती चांगल्या प्रकारे होत नसून दोन्ही बाजूंना व्यवस्थित गटार नसल्याने भर पावसात रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहत आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांना तसेच वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर कामाची दुरुस्ती ही रस्ता पूर्ण झाल्यापासून संबंधित शासकीय बांधकाम विभागाची व ठेकेदार यांची असून ही देखभाल दुरुस्ती दि.०१ /०६/२०२१ ते ३१/०५/२०२६ या कालावधीपर्यंत संबंधित विभाग आणि शासकीय ठेकेदाराची आहे. परंतु एकही वर्ष गटाराचे काम पूर्ण झाले नाही. मुळात सदरच्या रस्त्याला दोन्ही बाजूने गटारची आवश्यकता होती. मात्र एकाच बाजूने गटार बनवले गेले त्यानंतर त्या गटाराची देखभाल झाली नाही. त्यामुळे भर पावसात पाणी रस्त्यावरून वाहते. सदर पावसाचे पाणी रस्त्यालगत असणाऱ्या घराच्या आवारात फिरत आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या वस्तीस असणाऱ्या ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविक भक्तगण हे कोकणात येत असतात. त्यामुळे त्या आनंदाच्या प्रसंगी अचानक रस्त्यावर अपघात घडल्यास किंवा नाहक हानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांकडून होत आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष वेधून चतुर्थी सणाच्या अगोदर सदर रस्त्याची डाकडुजी करावी ही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.संबंधित विभागाने आपला लक्षवेधून त्वरीत काम पूर्ण करावे.