संगीत व भजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल डोंबिवली वाशी यांच्यावतीने सन्मान
सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर
दिनांक १९ जुलै २०२४
ओटवणे तथा बावळाट परिसरातील प्रसिद्ध भजनी बुवा मुंबईस्थित प्रकाश गणपत चिले यांना संत परंपरेचा वारसा जतन करीत संगीत व भजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्य व योगदानाबद्दल डोंबिवलीवासियांच्यावतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रकाश चिले यांनी भजन कलेची जोपासना करताना संगीतसेवेमधून संगीत क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले. तसेच त्यानी आपल्या भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करताना भजन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
डोंबिवली येथील गावदेवी प्रासादिक भजन मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात
मंडळाचे संस्थापक तथा समाजसेवक भजन संजय पवार, अध्यक्ष दीपक खामकर, डोंबिवली लोकसेवा समितीचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळा परब, माजी अध्यक्ष भरत सुर्वे, श्री नाटेकर, डोंबिवलीकर भजन हितवर्धक महासंघाचे सचिव दिलीप धुरी, भजन स्वरानंदचे संस्थापक अभिषेक परब, अध्यक्ष वसंत सावंत, गुरुकृपा हार्मोनियमचे मालक तथा संगीतकार आनंद बुवा मेस्त्री, भजन सम्राट सुनिल जाधव, उद्योजक श्री पाटील, विष्णू स्मृती संगीत प्रसारक मंडळाचे सचिव किरण सरवणकर, तसेच मुंबईतील नामवंत कलाकार आणि संगीत व भजन प्रेमी उपस्थित होते.
बुवा प्रकाश चिले इयत्ता चौथी पासुन गेली चार दशके भजन व संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत राज्यस्तरीय १०० भजन स्पर्धांमध्ये सहभाग घेत १८ वेळा प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच ९०० भजन मंडळांचा समावेश असलेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यावेळी माजी केंद्रिय संरक्षण मंत्री शरद पवार यांच्याहस्ते देऊ नगरीत सृजनशील पुरस्काराने प्रकाश चिले यांना गौरविण्यात आले. तत्पूर्वी ठाणे रायगड पुणे विभागीय भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांनी आतापर्यंत राज्यातील ७० भजन स्पर्धामध्ये परीक्षण केले आहे. बुवा प्रकाश चिले यांच्या संगीत व भजन कलेतील योगदान बद्दल त्यांना चार वर्षांपूर्वी डोंबिवली येथील अष्टगंधा प्रतिष्ठानचा भजनाचार्य हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला होता.
यावेळी दीपक खामकर, बाळा परब, श्री नाटेकर आदी मान्यवरांनी बुवा प्रकाश चिले म्हणजे डोंबिवलीकरांच्या आवाजाची शान अशा शब्दात प्रकाश चिले यांच्या कलेचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी प्रकाश चिले यानी आपल्या या जडणघडणीत आपल्या गुरुंसह या क्षेत्रांतील सहकारी तसेच तमाम संगीत व भजन रसिकांच्या प्रोत्साहन महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.