
दिनांक:०४/११/२०२६
बांदा : गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने मंगळवारी रात्री कृषिप्रधान गाव असलेल्या विलवडे येथे दमदार एन्ट्री केली. बांदा, कास, मडुरे, इन्सुली, पाडलोस, सोनुर्ली येथे वावर केल्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो विलवडे टेंबवाडी येथे दाखल झाला. पहिल्याच एन्ट्रीत त्याने कार व पाण्याची टाकी फोडून नुकसान केल्याने विलवडे, मळावाडी, टेंबवाडी येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भितीच्या वातावरणामुळे ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली.
मंगळवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.०६ वाजता ओंकार टेंबवाडी परिसरात आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये भीती दायक वाटत आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. मात्र रात्री उशिरापर्यंत तो गावातच फिरत होता.
रात्री १२.४७ वाजता ओंकार विलास मुकुंद सावंत यांच्या घराजवळ आला. अवघ्या चार मिनिटांत म्हणजेच १२.५१ वाजता त्याने त्यांची कार फोडून मोठे नुकसान केले. कारच्या काचा फुटल्या, बोनेट चेपले. या आवाजाने घरातील लोक घराबाहेर आले, मात्र हत्तीच्या भीतीने पुन्हा घरात शिरले.
त्यानंतर रात्री १.१९ वाजता बांदेकर यांच्या शेतात शिरला. शेतातील पिकांचे नुकसान केले. रात्री १.२० वाजता त्याने क्रस्तु पावलू यांच्या घराशेजारील ५०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी फोडली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रात्री १.२३ वाजता तो खामदेव मंदिराच्या पाठीमागे असताना ड्रोन कॅमेऱ्यात स्पष्ट दिसला. त्यानंतर १.२६ वाजता तो महार काटे येथे गेला. बुधवारी सकाळी नदीच्या आसपास त्याचा संचार सुरू असल्याचे वन विभागाने सांगितले.
विलवडे हे प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेले गाव आहे. भात, नाचणी, काजू, वाल, इतर भाजी पाला ही येथील मुख्य पिके आहेत. गेल्या काही वर्षांपासून हत्तींचा वावर वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. मंगळवारी रात्रभर शेतात राखण करत लहान मुले, महिला, वृद्ध यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ओंकार हत्तीला सुरक्षितपणे पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावे आणि आमची शेती वाचवावी. दरवर्षी पाऊस,वानर, इतर पाण्यापासून नुकसान होत आहे, पण कायमस्वरूपी उपाय होत नाही. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, ओकार हत्तीसाठी योग्य ती पावले उचलावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, वन विभागाने ग्रामस्थांना रात्री घराबाहेर न पडण्याचे, हत्तीला त्रास न देण्याचे आणि त्याच्या जवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.

