आताच शेअर करा

दिनांक: १२/१०/२०२६

तळवणे | प्रतिनिधी- शंकर गावडे

सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरात
नवरात्रोत्सवानिमित्त भक्ती, परंपरा आणि लोककलेचा संगम अनुभवायला मिळत आहे. नऊ दिवसांच्या या नवरात्रोत्सवात धार्मिक विधी, नामांकित भजन मंडळांचे सादरीकरण, दशावतारी नाट्यप्रयोग, दांडिया नृत्य, कीर्तन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसापासूनच भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी कार्यक्रमांसाठीही भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाच्या असमानतात दरवळून निघाला आहे.

    नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजता श्रीदेवी माऊलीचे विधिवत पूजन आणि घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता गोव्यातील नामांकित भजन मंडळांच्या भजनांचा कार्यक्रम पार पडला. विविध भजन मंडळांनी सादर केलेल्या भक्तिगीतांमुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

**आज दुसऱ्या दिवशी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी**

आज सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत रवळनाथ वाडी येथील भाविकांकडून श्री देवी माऊली चरणी अभिषेक सेवा अर्पण करण्यात आली आहे. सायंकाळी साडेसात वाजता अणसुर येथील सद्गुरू प्रासादिक भजन मंडळाचा भजन कार्यक्रम झाला.त्यानंतर रात्री 09.00  वाजता  मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

**पुढील दिवसांतही विविध कार्यक्रमांचे आयोजन**

नवरात्रोत्सवाच्या पुढील दिवसांतही भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. पाचव्या दिवशी भाटलेवाडी बॉयज, भटवाडी यांच्या सौजन्याने अभिषेक सेवा, तसेच तालुकास्तरीय नामांकित ग्रुप दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सहाव्या दिवशी सुतारवाडी यांच्या सौजन्याने अभिषेक सेवा आणि कवठी येथील चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

    सातव्या दिवशी वेळवेवाडी, सुमेवाडी, दगडखोलवाडी आणि खिरईवाडी येथील भाविकांकडून अभिषेक सेवा केली जाईल.
     
     सायंकाळी ७ वाजता सामुदायिक आरती होणार आहे. जिल्हा परिषद शाळा तळवणे क्रमांक १ येथे शारदोत्सव आणि लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
     आठव्या दिवशी पेडणेकरवाडी, गावतळकरवाडी, पालववाडी यांजकडून अभिषेक सेवा, तर रात्री  डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे. या कार्यक्रमात लोरे, कणकवली येथील बुवा रिया मेस्त्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ आणि मालवण येथील बुवा अंकिता गावडे,अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळ सहभागी होणार आहेत.

    नवव्या दिवशी पुणे येथील ह. भ. प. श्री हरिहर नातू बुवा यांचे कीर्तन होणार आहे. तर दहाव्या दिवशी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता वारकरी भजन आणि रात्री 10.00 वाजता वायंगणी येथील हेतांब दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

**महाप्रसाद आणि आरतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन**

नवरात्रोत्सवाच्या 10 व्या दिवशी आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन श्रीदेवी माऊलीचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. दुपारी होणाऱ्या आरतीसाठी सर्व सुवासिनी महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

धार्मिक श्रद्धा, कोकणातील पारंपरिक लोककला आणि गावाच्या सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवणारा हा नवरात्रोत्सव तळवणे परिसरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed