
दिनांक: १२/१०/२०२६
बांदा:सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
इयत्ता पहिली ते दुसरी गटातील वक्तृत्व व चित्रकला या दोन्ही स्पर्धांमध्ये किर्ती राजेंद्र गावकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता तिसरी ते चौथी गटातील चित्रकला स्पर्धेत स्वप्निल संजय गावडे याने प्रथम क्रमांक, तर मानस महेश नाईक पहिली दुसरीच्या चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिन्ही विद्यार्थ्यांची सावंतवाडी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या कलागुणांची प्रभावी छाप उमटवली. त्यांच्या या यशातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली गुणवत्ता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास अधोरेखित झाला आहे.
या यशासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, केंद्रप्रमुख ज्योत्स्ना देसाई तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
