
दिनांक: ०५/०९/२०२६
बांदा / प्रतिनिधी
धान्य व इतर खाद्यपदार्थांच्या पिशव्यांवर भगवान श्रीकृष्णाचे चित्र छापण्यात येते. मात्र, धान्य संपल्यानंतर या पिशव्यांचा कचरा, मासे वाहतूक तसेच इतर कारणांसाठी वापर होत असल्याने धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भाजप सोशल मीडिया बांदा मंडळ संयोजक विराज परब यांनी मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
गणेश बांदेकर यांनी या प्रकाराची माहिती विराज परब यांना दिल्यानंतर परब यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यानंतर विराज परब व बाबा काणेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून या विषयाचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी सावंतवाडी येथे आल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्याचे सांगितले होते.
त्यानुसार विराज परब, बाबा काणेकर, दर्पण आळवे व गणेश बांदेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन सदर मागणीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी चौघांनीही धान्याच्या पिशव्यांवर भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा छापल्यानंतर धान्य संपल्यावर या पिशव्यांचा कचरा, मासे वाहतूक तसेच अन्य कारणांसाठी होत असलेल्या वापराची बाब पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. धार्मिक प्रतिमेचा अशा प्रकारे गैरवापर होत असल्याने धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असून, या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अशा पिशव्या वापरल्यानंतर रस्त्याकडेला, कचराकुंडीत किंवा अस्वच्छ ठिकाणी टाकल्या जात असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी या पिशव्यांचा मासे वाहतूक व इतर व्यावसायिक कारणांसाठीही वापर होत असल्याने धार्मिक प्रतिमांचा अशा पद्धतीने वापर होणे योग्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धार्मिक प्रतिमा असलेल्या पिशव्यांच्या वापराबाबत योग्य धोरण निश्चित करावे, संबंधित उत्पादक व वितरकांना आवश्यक सूचना द्याव्यात तसेच अशा पिशव्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या मागणीची पालकमंत्री नितेश राणे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, याबाबत लवकरच संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा शब्द त्यांनी शिष्टमंडळाला दिला.
