
दिनांक: ०४/०९/२०२६
बांदा | प्रतिनिधी
बांदा येथील पिंपळेश्वर मंदिर–वाळकेश्वर मंदिर रोडवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रथम खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर आणि बांदा मंडल सोशल मीडिया प्रमुख विराज परब यांनी पाठपुरावा केला.
दोन दिवसांपूर्वी रस्त्यालगतची झाडी-झुडपे साफ करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर होणारी वाहतूक लक्षात घेता खड्डे तातडीने भरण्यात येत आहेत.
सध्या खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, त्यानंतर रस्त्याच्या पुढील कामाला सुरुवात होणार आहे. कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले आहेत.

