
दिनांक: ०४/०९/२०२६
बांदा:मुंबई येथून गावी आलेले वसंत नारायण इन्सुलकर (रा. इन्सुल गावठणवाडी) यांना घरगुती कारणावरून झालेल्या वादातून सावत्र भावाने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत वसंत इन्सुलकर हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत इन्सुलकर हे मुंबईहून गावी आलेले असताना घरातील साफसफाईचे काम सुरू होते. या दरम्यान त्यांचा सावत्र भावासोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन भावाने केलेल्या मारहाणीत वसंत यांच्या डोक्याला दोन ठिकाणी गंभीर मार बसला. यामध्ये एका जखमेला तीन टाके पडले असून त्यांच्या पायालाही दुखापत झाली आहे.
घटनेनंतर त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा येथे दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले.
या घटनेबाबत बांदा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन वसंत इन्सुलकर यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानुसार संबंधित भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बांदा पोलीस कर्मचारी प्रसादी करत आहेत.
