
दिनांक: ०३/०९/२०२६
बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादनात वाढ व्हावी तसेच जिल्ह्यातील दुग्ध सहकारी संस्था अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आदर्श दूध सहकारी संस्था स्पर्धेत बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था मर्यादित, बांदा हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्ह्यातील दूध संस्थांचे व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार, डिजिटल व्यवहार, दूध संकलनातील वाढ, सभासद सेवा तसेच शासकीय योजनांचा प्रभावी वापर या विविध निकषांवर संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थेने प्रथम क्रमांक मिळविला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गजानन गायतोंडे व उपाध्यक्ष रुपेश माजगावकर यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बाबा काणेकर, विराज परब, समीर सावंत आणि समीर पेळपकर उपस्थित होते.
बांदा पंचक्रोशी दूध संस्थेने मिळविलेल्या या जिल्हास्तरीय यशामुळे संस्थेच्या सभासदांसह दूध उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संस्थेच्या पारदर्शक व शिस्तबद्ध कारभाराला मिळालेली ही पावती असून, या यशामुळे परिसरातील दूध व्यवसायाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
