
दिनांक: १६/०७/२०२६
सावंतवाडी : मुलाचे दुःख हे आई-वडिलांसाठी न पचवणारी गोष्ट आहे. मात्र, धीर धरा .. स्वतःला सावरा, कुटुंबीयांची काळजी घ्या, अशा शब्दांत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पत्रकार सिताराम गावडे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे संपादक ज्येष्ठ पत्रकार तथा सकल मराठा व सकल हिंदू संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांचा पुत्र समर्थ सिताराम गावडे याचे बुधवारी रात्री दहा वाजता दुःखद निधन झाले.
या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी १६ रोजी दुपारी सिताराम गावडे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे सांत्वन केले. ही घटना नक्कीच वेदना देणारी आहे. मात्र, तुम्ही आता धीर धरा. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, अशा शब्दांत त्यांनी गावडे कुटुंबियांना धीर दिला.
यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवि मडगांवकर, गजानन गावडे, विद्याधर परब, नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, अमित गवंडळकर, बंटी पुरोहित, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ आदी उपस्थित होते.
