आताच शेअर करा

दिनांक: २४/०४/२०२६

संपादकीय:आज मागे वळून पाहताना त्या दिवसांची खूप आठवण येते, जेव्हा आयुष्य घड्याळाच्या काट्यावर नाही तर शाळेच्या टोल्यावर चालायचं. आमची शाळा घरापासून बरीच दूर होती. आजच्यासारख्या बस किंवा रिक्षा तेव्हा नव्हत्या, त्यामुळे तो मैलोन्मैल पायी प्रवास हाच आमचा रोजचा सराव असायचा. वाटेत चिखल असायचा, माती असायची आणि अडथळे म्हणून उभे असलेले दगड-धोंडेही. कधी कधी चालताना चुकून पाय शेणात पडायचा, मग तिथेच रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला पाय पुसून मी पुढे चालायचो. शाळेत पोहचल्यावर नळाच्या थंडगार पाण्याने पाय स्वच्छ धुणे हा एक रोजचा सोहळाच असायचा.
माझ्या या प्रवासात मी कधीच एकटा नव्हतो. माझे जिवलग बालमित्र नेहमीच माझ्या सावलीसारखे सोबत असायचे. वर्गात गेल्यावर रांगेत आम्ही नेहमी एकत्रच बसायचो. त्या शांत वातावरणात खोडसाळपणा केल्याशिवाय मला चैन पडायचं नाही. मागून हळूच मित्राला पेन्सिल टोचून मी त्याला सतवायचो. तो रागावला की पुन्हा त्याला लाडीगोडी लावून आपली मैत्री पक्की करून घ्यायचो. ते रुसवे-फुगवे किती क्षणिक आणि निरागस होते!
खेळायची साधनंही आम्ही स्वतःच बनवायचो. जुन्या कापडाचा चेंडू मी स्वतः खूप छान शिवायचो. खेळाला अधिक रंगत यावी म्हणून त्या चेंडूत एखादं फळ घालायचो, जेणेकरून तो लागल्यावर थोडी जास्त ‘मज्जा’ येईल. मग काय, तो चेंडू घेऊन एकमेकांच्या मागे धावणे, पाठीत चेंडू लागल्यावर धपकन मातीत लोळणे, यातच आमचे संपूर्ण जग सामावलेले असायचे.
पाऊस सुरू झाला की आमचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. पावसाच्या साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणे आणि बैलगाडी दिसली की त्याच्या धुरावर (मागच्या लाकडी दांड्यावर) हळूच जाऊन बसणे, यात जे सुख होतं ते आजच्या महागड्या गाड्यांमध्येही नाही. आम्ही लंगडी, विटीदांडू आणि खो-खो तासनतास खेळायचो. भूक लागली की समोर दिसेल त्या झाडावर चढून आंबे, फणस किंवा केळी काढून त्यावर ताव मारायचो. खेळताना सुसाट पळताना अनेकदा मी जमिनीवर आदळायचो, रक्त यायचं, पण रडत न बसता तिथेच पडलेली सुकी माती त्या जखमेवर चोळायचो आणि पुन्हा खेळायला सज्ज व्हायचो.
शाळेच्या शिस्तीत असूनही आमचं एक वेगळंच साम्राज्य होतं. कधी कधी सरांची नजर चुकवून वर्गाच्या खिडकीतून बाहेर उडी मारण्याचे धाडस आम्ही करायचो. शाळा सुटली की आनंदाने ओरडत घराच्या दिशेने धाव सुटायची. वाटेत ओढ्याचं स्वच्छ पाणी दिसलं की झुकून ते पाणी घटाघटा पिण्यात एक वेगळीच तृप्ती असायची. आम्ही सर्व मित्र मिळून अशा कितीतरी करामती करायचो. ते दिवस, ती माती आणि ती निस्वार्थ मैत्री आजही माझ्या मनात अगदी ताजी आहे.

शब्दवेध साहित्य समूह आयोजित उपक्रम
दि. 10 एप्रिल 2026
विषय :रम्य ते बालपण

शीर्षक : माझे बालपण

शाळेची ती लांब वाट,
पायी पायी मी जायचो.
दगड धोंडे तुडवून,
चिखलात खेळायचो.

पाय लागता शेणात,
गवताला पुसायचो.
स्वच्छ करण्याला पाय,
नळावर धावायचो.

सोबतीला बालमित्र,
रांगेतच बसायचे.
सतवूनी त्यांना मी,
हळूच ते रुसायचे.

शिवलेला तो चेंडू मी,
मित्रांना मारत असे.
मातीतच लोळताना,
खूप मी हासत असे.

होड्या सोडून पाण्यात,
सुखात मी न्हात असे.
बैलगाडीच्या धुरावर,
हळूच मी बसत असे.

खेळ खेळता मैदानी,
जखमी मी होत असे.
लावूनी ती सुकी माती,
रक्त मी थांबवत असे.

शाळा सुटता जोरात,
उडी मी मारत असे.
वाटेतल्या ओढ्याचेही,
पाणी मी पीत असे.

संतोष चिले (गोवा )
मोबाईल नं 8275652482

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed