आताच शेअर करा

दिनांक: १७/०६/२०२६

बांदा: दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळेची घंटा पुन्हा एकदा घणाणली आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीचे अंगण बालहास्याने बहरून गेले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षणाची गुढी उभारण्यात आली होती. रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट आणि उत्साहाने भरलेले वातावरण यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता.
शाळेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे औक्षण करून आणि झाडांच्या रोपांची भेट देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातात रोप आणि डोळ्यांत उज्ज्वल भविष्यातील स्वप्ने पाहून उपस्थितांचे मन भरून आले. “हे रोप जसे वाढेल, तसेच तुमचे ज्ञान आणि व्यक्तिमत्त्वही फुलत राहो,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
याच प्रसंगी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशांचे वितरण करण्यात आले. नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध आणि नवीन गणवेश परिधान करण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. तसेच उमेद फौंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर आवश्यक साहित्य मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आत्मविश्वासाचे हास्य फुलले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर उपाध्यक्ष यशोदा गावडे,मधूकर गावडे,संतोष कविटकर,सहदेव गावडे, पोलिस पाटील समृद्धी गावडे,संजना गावडे,रजिता गावकर,अक्षरा असनोडकर,सोनाली कविटकर,जानकी गावडे , नियती नाईक,किशोरी गावकर, वासुदेव नाईक,वर्षा शेंणवी, अंगणवाडी सेविका संजना गावकर मदतनीस अमृता कविटकर संचिता सावंत आदी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जे.डी.पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे मुरलीधर उमरे धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले
पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया आहे आणि प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
स्वागताची गुढी, हातातील हिरवेगार रोप, नव्या पुस्तकांचा सुगंध आणि शिक्षणाची नवी उमेद… या सर्वांच्या साक्षीने घारपी शाळेतील प्रवेशोत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नव्या स्वप्नांचा आणि उज्ज्वल भविष्याचा आनंदोत्सव ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed