आताच शेअर करा

दिनांक: ०४/०४/२०२६

सावंतवाडी: कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची बातमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे ता.सावंतवाडी परिसरातील युवा जादूगार वैभव रामदास पारकर (कलाक्षेत्रातील नाव – जादूगार वैभवकुमार) यांना पुणे येथील प्रतिष्ठित संस्थेने Artbeats India Excellence Awards या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्माननीत करण्यात आले आहे. कला व मनोरंजन विभागात कोकणातील उत्कृष्ट जादूगार म्हणून त्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्टबीट्स फाउंडेशन, पुणे तर्फे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध कलाक्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. आर्ट बिटस् ही संस्था गेली २५ वर्षे सातत्याने चित्रकला, शिल्पकला, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. याच प्रतिष्ठित व्यासपीठावर यंदा जादूगार वैभव कुमार यांच्या जादू कलेची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकणातील त्यांचे जन्मगाव असणाऱ्या बांदा गावातून आपल्या कलेची सुरुवात करणाऱ्या जादूगार वैभव कुमार यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पारंपारिक जादू आणि आधुनिक स्टेज प्रेझेंटेशन यांचा उत्कृष्ट संगम साधत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या सादरीकरणामध्ये हिप्नॉटिझम, सस्पेन्सकाॅमेडी, नाट्यमयता आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची खास शैली त्यांच्या कार्यक्रमात दिसून येते, त्यामुळे त्यांचे कार्यक्रम नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. विशेष म्हणजे, जादूगार वैभवकुमार यांनी जादू कलेचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित ठेवला नाही, तर सामाजिक प्रबोधनासाठीही केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी त्यांनी विविध शाळा व ग्रामीण भागात जादूतुन चमत्कार आणि चमत्कारामागील विज्ञान यांचे शेकडो प्रयोग सादर करून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानालाही पुरस्कार समितीने विशेष दाद दिल्याचे समजते. हा पुरस्कार त्यांना मिळाल्यावर भावना व्यक्त करताना जादूगार वैभव कुमार म्हणाले की, “हा सन्मान माझ्यासाठी मोठी प्रेरणा दायी आहे. कोकणातील छोट्या गावातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचणे सोपे नव्हते, माझ्या ग्रामदेवतेची कृपा व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने, प्रेक्षकांचे प्रेम, कुटुंबाचा पाठिंबा आणि सततची मेहनत यामुळे हे शक्य झाले.” त्यांच्या या वक्तव्यातून त्यांच्या प्रवासातील संघर्ष आणि जिद्द स्पष्टपणे दिसून येते. या यशामुळे कोकणातील नवोदित कलाकारांसाठी नवी दिशा निर्माण झाली असून, ग्रामीण भागातूनही मोठ्या मंचावर यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे कोकणाच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांना आजपर्यंत महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार, राष्ट्रीय युवा जादूगार पुरस्कार, जादू भूषण पुरस्कार, जादू विशारद पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा बाल वैज्ञानिक विज्ञान पुरस्कार व  दिल्लीत मिळालेला वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकाॅड इंटरनॅशनल पुरस्कार असे अनेक संस्थांकडून शेकडो पुरस्कार त्यांना आजवर मिळाले आहेत भविष्यात ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या कलेचा ठसा उमटवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जादूगार वैभवकुमार आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी करत आहेत. कोकणात जादूची एक छोटी अकादमी सुरू करून, या लुप्त होत चाललेल्या कलेला पुनरुज्जीवित करण्याचा त्यांचा मानस आहे. वैभव रामदास पारकर यांच्या या यशाने सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed