
दिनांक: १० ऑक्टोबर २०२५
बांदा प्रतिनिधी: मडूरा परब वाडी परिसरात ठाण मारून बसलेला ओमकार हत्ती यांनी ग्रामवासियांचे जनजीवन विस्कळीत करून सोडले आहे. भर कातरणीच्या तोंडावर हत्ती गोव्यातून तेरेखोल नदीचे पात्र ओलांडून प्रथम कास, नंतर सातोसे आणि आता मडूरा येथे येऊन पोचला. परंतु हा हत्ती गेले आठ दिवस येथील शेतकऱ्यांच्या नारळाच्या बागेचे आणि भातशेतीचे बरेच नुकसान केले आहे. हाताशी आलेले पिक हत्तीच्या भीतीने कापता येत नाही. वर्षभराची कसलेली शेती हत्ती ने नासधूस केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासन दरबारी ओंजळ पकडून हत्तीला येथून घालवा किंवा त्याला जेल बंद करा अशी वेळोवेळी शेतकरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे मागणी करत आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशा नुसार आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहे. अशी धातूर मातुर उत्तरे
वनविभागातील वनरक्षक देत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधीकडे धाव घेतली आहे. शेतकऱ्यांनी मडूरा गावचे सुपुत्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या माध्यमातून उप वनविभाग अधिकारी मिलेश शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता बैठकीत मिलेश शर्मा म्हणाले की ओंकार हत्तीला जेलबंद करण्यासाठी प्रशासनाची परवानगी मिळाली आहे.
हत्तीस पकडण्यासाठी लागणारी यंत्रणा व रस्ते जागा, त्यासाठी लागणारी टीम याची जेलबंद करणारी टीम याची तरतूद चालू आहे. येत्या शनिवार पर्यंत ही टीम येऊन आपले काम चालू करेल असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. हत्तीस जेलबंद करण्यास योग्य जागा मडूरा येथे असल्याचे सांगून लवकरात लवकर कारवाई करणार असेही म्हणाले. तो पर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा हत्ती हा वन्य प्राणी असून तो काहीही करू शकतो. नागरिकांनी त्याच्याजवळ जाणे टाळावे. तरुणांनी किंवा मुलानी सेल्फी आणि फोटो काढण्याचे प्रयत्न करू नये.वनविभागाची टीम हत्ती व नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे. त्यांना आपण सहकार्य करावे. संजू परब यांनी लवकरात लवकर जेलबंद करा असे सांगत वनविभाग अधिकारी शर्मा यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांचे आपणाला पूर्ण सहकार्य लाभेल. झालेल्या शेतीची नुकसान भरपाई याचे लवकर पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्या. असे शेतकऱ्यांच्यावतीने वनविभागाला सांगण्यात आले आहे.