
दिनांक: ७ ऑक्टोबर २०२५
सावंतवाडी: रेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील नवोदित रील स्टार दीपक पाटकर उर्फ “बेडूक भाई” याचे मडुरा येथे जागीच निधन झाले. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती मिळताच त्याचे सहकारी मित्र राजू धारपवार व अन्य सहकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
सावंतवाडी समाज मंदिर परिसरात राहणारा दीपक हा गेली अनेक वर्षे मिळेल ते काम करत होता. मद्यधुंद अवस्थेत फिरत असल्यामुळे तो अनेकांच्या लक्षात होता. मात्र गेल्या काही महिन्यात त्याने अशाच परिस्थितीत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून “बेडूक भाई” हे नवीन पेज सुरू केले होते. या माध्यमातून तो लोकांना हसवणारे व्हिडिओ तयार करत होता. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्याने आपला एक असाच व्हिडिओ तयार केला होता. त्यात “तुम्ही आनंदी राहा, सगळ्यांना सुद्धा आनंदात राहिला सांगा”, असा संदेश दिला होता. आज तो दुपारी पाडलोस येथील आपल्या बहिणीच्या घरी जात होता. मात्र साडेतीन वाजण्याच्या सुमारात तो रेल्वेला धडकून जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सावंतवाडीतील त्याच्या सर्व मित्रमंडळींनी बांदा येथे धाव घेतली. त्याचा मृतदेह बांद्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. तो मनमिळाऊ होता. कोणतेही काम सांगितले तर तो करत होता. त्यामुळे त्याच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.