
दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५
शिरोडा प्रतिनिधि:शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या व बेपत्ता असलेल्या ठिकाणी समुद्रकिनार पट्टीवर दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार ते साडेचार या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली.वॉटर रोबोटिक क्राफ्ट यंत्रणा शिरोडा समुद्रकिनाऱ्यावर कार्यान्वित करणार असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत अन्य अधिकारी उपस्थित होते. परवाच्या दिवशी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती तेथील ग्रामस्थ आजू अमरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिली .त्याचबरोबर त्यांनी किनारपट्टीवर जीव रक्षक ही नेमावे असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. अवघ्या काही दिवसात ही यंत्रणा आम्ही समुद्र किनारी लागू करू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
समुद्रात चार गायब झालेल्या पर्यटकांपैकी दोन पर्यटक मृतावस्थेत सापडल्याचे सांगण्यात आले त्यापैकी फरहान मोहम्मद मणियार वय २१ वर्षे हा रात्री त्याच दिवशी ११ वाजता सागरतीर्थ या समुद्र किनारी सापडला.
ड्रोन च्या साहाय्याने शोध मोहीम
मुलगा इकवान कितूर हा शनिवारी सकाळी ११ वाजण्याचा सुमारास मोचेमाड समुद्रकिनारी ड्रोनच्या साह्याने निदर्शनास आला.
या सर्व घटनेची माहिती पालकमंत्री नितेश राणे हे या घटनेवर लक्ष ठेऊन होते. त्यांच्या सूचनेनुसार दुसऱ्या दिवशी सकाळपासून समुद्रात ड्रोनद्वारे शोध मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी ड्रोन च्या माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये मोर्चेमाड मध्ये इकवान कित्तूर याचा मृतदेह सापडून आला. प्रशासनाच्या व नागरिकांच्या सहकार्याने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
समुद्रकिनारी झाले शेवटचे स्नेहभोजन
कुडाळ येथील मणियार कुटुंबात आणि बेळगाव येथील कित्तूर या कुटुंबामध्ये लग्न ठरले होते पुढील महिन्यात हा विवाह संपन्न होणार होता. यासाठी दोन्ही कुटुंबांनी मुंबई येथे जाऊन लग्नाची खरेदी केली होती. आनंदाच्या वातावरणात दोन्ही कुटुंब फिरण्यासाठी शुक्रवारी मालवण व शिरोडा वेळागर येथे आले. सर्वांनी मिळून किनाऱ्यावर आनंदाने स्नेहभोजन केले. परंतु जेवण झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याचा मोह आवरेना म्हणून सर्वजण मानवी साखळी करून समुद्रात उतरले परंतु क्षणार्धात आलेल्या एका मोठ्या लाटेने होत्याचे नव्हते करून सोडले. पाण्यात उतरलेले नऊ जण लाटे बरोबर समुद्रात वाहून गेले त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले तर तिघे मयत स्थितीत आढळले होते. उर्वरित चार जण बेपत्ता होते त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले.