दिनांक: २६ सप्टेंबर २०२५
वेगुर्ला प्रतिनिधि: लवकरच म्हणजे सन २०३० या वर्षी इतिहासिक मीठाच्या सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. १२ ते १५ मे १९३० या दरम्यान शिरोडा या. वेंगुर्ले या दिवशी मिठाचा ऐतिहासिक सत्याग्रह पार पडला. यासाठी म. गांधी यांची प्रेरणा होती. पण ते प्रत्यक्षात सहभागी झाले नव्हते.
यावेळी ६०० हून अधिक स्थानिक सत्याग्रहींनी यात सहभाग घेतला. ३५० हून अधिक सत्याग्रहींना तुरुंगात डांबण्यात आले. कित्येक सत्याग्रहीना पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या लागल्या. हा सत्याग्रह यशस्वी करण्यात येथील विविध संघटना तसेच शिरोडा येथील श्री माऊली देवस्थानचाही सक्रिय सहभाग होता.
शिरोडावासियांचे स्वातंत्र्यप्राप्ती करीता चे योगदान लक्षात घेता या सत्याग्रहींच्या प्रती कृतज्ञता म्हणून शिरोडा येथे सत्याग्रह स्मारक सन २०३० पर्यंत पूर्णत्वास यायला हवे, अशी येथील ग्रामस्थांची व इतिहासप्रेमींची इच्छा आहे.
३५ ते ४० वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांनी शिरोडा येथील या सत्याग्रह स्मारकासाठीच्या जागेची पाहणी केली. ३५ वर्षांनंतरही सदरची जागा केंद्र सरकारच्या मीठ उत्पादन शुल्क (सॉल्ट) खात्याकडून स्थानिक प्रशासनाकडे हस्तांतरित होऊ शकलेली नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.
जगभरातील काही इतिहासप्रेमी तसेच गोवा व कोकण फिरण्यासाठी येणारे हजारो पर्यटक मिठाच्या सत्याग्रहाचे ठिकाण पाहण्यास उत्सुक असतात. परंतु या भागात सत्याग्रहाचे ठिकाण कुठे आहे? हे कळण्यासाठी कोणतीही फलक व्यवस्था नाही. सत्याग्रहाच्या ठिकाणी ओसाड, ओबडधोबड जमीन व बंद पडत आलेली मिठागरे तेव्हढी दिसतात.
“@ या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला होता. @”
असे पर्यटकांना व इतिहासप्रेमी यांना सांगताना लाज वाटते असे येथील युवावर्गाचे म्हणणे आहे. कारण इतिहासाला उजाळणी देणारी कुठलीही खूण आज इथे अस्तित्वात नाही.
गुजरात राज्यात घोषणा झाल्यापासून अवघ्या ५ वर्षांच्या काळात पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक उभे राहू शकते. मात्र महाराष्ट्रात सत्याग्रह स्मारकाबाबत राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडतेय? सिंधुदुर्गातील नेतेमंडळी याबाबत काय करतात? हा एक संशोधनाचा विषय आहे.
शिरोडा येथील नियोजित सत्याग्रह स्मारकाच्या ठिकाणी २ आक्टोबर २०२५ रोजी जागरूक नागरिक एकत्र येऊन एकदिवसीय उपोषण करणार आहेत. २०३० या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या अगोदर सत्याग्रह स्मारकाची उभारणी होईल का? संबंधित प्रशासन याकरिता नियोजनबद्ध प्रयत्न करेल का? इत्यादी प्रश्न घेऊन आज उपोषणकर्ते नागरिक उपोषण करणार आहेत.
अर्थात शांत व सनदशीर अशा मार्गाने शासनाला जाग आणून देण्याकरीता हा प्रयत्न आहे. परंतु सत्याग्रह स्मारकाबाबतची शासनाची अनास्था अशीच खपवून घेतली जाईल, असा अर्थ शासनाने काढू नये. असे शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश ऊर्फ बड्या परब व संदीप गावडे म्हणाले.