
दिनांक: १९ सप्टेंबर २०२५
सावंतवाडी: कोलगाव येथील निरामय विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील गरीब व होतकरू अशा ४२ विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ४ लाख ७५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. निरामय विकास केंद्राच्या संचालिका वंदना करंबेळकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ही मदत करण्यात येते.
ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना अकरावी व पुढील व शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही अशा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ही आर्थिक मदत करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीमध्ये, आयटीआय मध्ये प्रवेश घेतला तसेच बारावीनंतर अन्य कोर्सला प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना दहा हजारापर्यंत ही आर्थिक मदत करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निरामय विकास केंद्राच्यावतीने अशा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते.
या वर्षात निरामय विकास केंद्राच्यावतीने १० शाळांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत करण्यात आली होती. तसेच या संस्थेच्यावतीने दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना आरोग्यासाठी सुद्धा मदत केली जाते. तसेच गंभीर आजारी व अपघातात गंभीर जखमी असलेल्या ज्या रुग्णांना फावलर बेड आणि व्हील चेअर घेणे शक्य नाही. अशा रुग्णांना वापर आणि परत करा या तत्त्वावर फावलर बेड आणि व्हील चेअर दिली जाते.