
दिनांक: १३ सप्टेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी: समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो नव्हे ती आपली जबाबदारी आहे, या सामाजिक जाणिवेतून समाजात अनेक संस्था कार्यरत आहेत. “मानव सेवा, हीच ईश्वर सेवा” या भावनेतूनच या समाजसेवी संस्था सर्वत्र कार्य करत असतात. अशाच स्वयंसेवी संस्थापैकी मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने रोणापाल येथील दयासागर वस्तीगृहास वर्षभर पुरेल अशा सुमारे २ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यात धान्यासह इतर संपूर्ण किराणा देण्यात आला.
या सेवाभावी संस्थेच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून असे उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. गेल्यावर्षीही या संस्थेच्यावतीने या वस्तीगृहासह कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील शोषित मुक्ती अभियान संस्था संचालित नाग्या महादू कातकरी वस्तीगृहालाही या वस्तीगृहासह जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले होते. तसेच आयुर्वेद महाविद्यालयाला देखील सुमारे ३.५० लक्ष रुपयांचे साहित्य प्रदान करण्यात आले होते. या संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक मास्टर चोआ कॉक सुई यांच्या नावे फिरते वैद्यकीय पथक सह्याद्री पट्ट्यात सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरापासून कार्यरत आहे. समाजातील खऱ्याखुऱ्या गरजवंतांचा शोध घेऊन ही मदत केली जात असल्यामुळे या संस्थेची ही मदत खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. यापुढेही जिल्हयात गरजवंत समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याचा या संस्थेचा मानस आहे.
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षे निस्वार्थी भावनेने शहरासह ग्रामीण ते अति दुर्गम भागात सातत्याने विविध उपक्रम राबवतात. तसेच आपल्या परिचयाच्या अनेक स्वयंसेवी संस्थांच्या विविध उपक्रमाचा लाभ ते गरजवंतांना मिळवुन देतात. मुंबईतील ही संस्थाही डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांच्या माध्यमातून दोन वर्षांपासुन जिल्ह्यात कार्यरत आहे. या संस्थेचे ध्येय पाहता यापुढेही या संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजूंना मिळवुन देण्याचा डॉ प्रविणकुमार ठाकरे यांचा मानस आहे.
सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल येथील हे वसतिगृह
“एम फॉर सेवा” या संस्थेचे आहे. या वसतिगृहात अनाथ, एकल पालक असलेले तसेच गरीब विद्यार्थी आहेत. वसतिगृहाला दिलेल्या या जीवनावश्यक वस्तूंमध्ये अन्न धान्य, मसाले, तेल व इतर भोजन सामुग्रीसह साबण, पेस्ट आदी साहित्याचा समावेश आहे. यावेळी दयासागर वस्तीगृहाचे जिवबा वीर यांनी योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेचे आभार मानले. यावेळी क्रियान्वयन फाउंडेशनच्या सेवाभावी कार्यकर्त्या डॉ मुग्धा ठाकरे, डॉ प्रविणकुमार ठाकरे, दयासागर वस्तीगृहाचे जिवबा वीर, मंगल कामत आदी उपस्थित होते.