
दिनांक: १७ ऑगस्ट २०२५
बांदा प्रतिनिधी: सावंतवाडीसह कुडाळ तालुक्यातही वाफोली येथील माऊली गोविंदा पथकाने आपल्या वेग आणि कौशल्याच्या बळावर मळगाव व गांधीचौक मित्र मंडळ बांदा येथील दहीहंडी स्पर्धेत सहा थरांचा मानवी मानोरा रचून दहीहंडी फोडून मानाचे स्थान पटकावले आहे.तसेच पिंगुळी,कुडाळ व कट्टा कॉर्नर मित्र मंडळ बांदा आयोजित मानाची दहीहंडी स्पर्धेत प्रत्येकी सहा थरांचा मानवी मानोरा रचून यशस्वी सलामी देण्यात आली.पावसाची रिपरिप असून सुद्धा गोविंदाचा उत्साह कमी झाला नाही.भर पावसातही दहीहंडी रसिकांनी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.प्रत्येक कार्यक्रम स्थळी डिजेच्या तालावर गोविंदांनी दिलखेचक डान्स करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ढोल-ताशांचा गजर,घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने चौकात जल्लोषाचे वातावरण रंगले होते.अथक परिश्रम,जिद्द आणि कौशल्याच्या बळावर तसेच शिस्तबद्ध असे मोलाचे मार्गदर्शन अमोल सावंत यांचे लाभले होते.