
दिनांक: १६ मे २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
बांदा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून देखील मागील ५० ते ६० वर्षे बांदा शहरातील विद्युतवाहिन्यांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. सदर वाहिन्या ह्या जुनाट झालेल्या असून ठीकठिकाणी जोडण्या देऊन वापर केला जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना अनियमित दाबाचा वीज पुरवठा होतो. प्रत्येकवर्षी उन्हाळ्याचे चार महिने लोकांना हा त्रास सहन करावा लागतो. तसेच अशा जीर्ण झालेल्या विद्युतवाहिन्यांमुळेच मागच्या वर्षी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे. बांदा बाजारपेठ ही कापड व्यापारासाठी प्रसिद्ध असून, अशा जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शहरातील सर्व विद्युत वाहिन्यांचे नूतनीकरण करावे अशी मागणी भाजप पदाधिकारी यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट घेत केली. तसेच निवेदन सादर केले. याबाबत पालकमंत्री यांना भेटून सदर विषय सांगितल्यावर त्यांच्याकडून देखील याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
यावेळी बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे व प्रशांत बांदेकर आदी उपस्थित होते.