आताच शेअर करा
फोटो—–
सुरेश गावडे (माजी सरपंच रोणापाल )

दिनांक: ६ मे २०२५

बांदा  प्रतिनिधी: अक्षय मयेकर
सावंतवाडी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर अनेक अपघात घडतात. त्यांना उपचारासाठी गोवा बांबुळीची वाट धरावी लागते. शक्तीपीठ महामार्गपूर्वी मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनवा आणि नंतरच विकासकामांवर बोला. शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असे म्हणणारे आमदार दीपक केसरकर यांनी पहिल्यांदा सावंतवाडी तालुक्यातील मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे आणि नंतरच विकासकामांच्या बाता माराव्यात अशी टीका, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
माजी सरपंच सुरेश गावडे म्हणाले की, सगळा विकास करायला आणि उपभोगायला माणूस जिवंत राहिला पाहिजे. त्यासाठी एक अत्यावश्यक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर असून ते अद्याप झाले नाही. प्रत्येक वेळी आमदार दीपक केसरकर आपल्या सोयीनुसार भूमिका घेऊन आवश्यक गोष्टी बाजूला करत पत्रकार परिषदाद्वारे अनावश्यक गोष्टींची प्रसिद्धी करतात. काय आहे शक्तीपीठ महामार्ग कोणालाही माहिती नाही आणि सर्वांना माहीत असलेल्या, गरज असलेल्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलबद्दल काहीच कार्यवाही नाही असे का यावर आमदार केसरकर यांनी उत्तर द्यावे, असे सुरेश गावडे यांनी पत्रकात म्हटले.
*साहेब जरा स्पष्टच बोला*
सावंतवाडी तालुक्यात मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नसल्याने मृत्युमुखी पडणाऱ्या प्रत्येकाच्या प्रसंगाला आपण जाऊ शकत नाही. त्यातील बहुतांश लोकांनी तुम्हाला मतदान केले आहे. योग्य विचार करून निर्णय घ्या, शक्तीपीठ महामार्ग महत्त्वाचा की मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल महत्त्वाचे, हे जरा साहेब स्पष्टच बोला असा टोला सुरेश गावडे यांनी लगावला.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *