
दिनांक:२७ जानेवारी २०२५
दोडामार्ग: तळकट येथील मानसी मनोहर देसाई (वय ३८) या महिलेचा झोळंबे येथील शेत विहिरीत तोल जाऊन पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत दोडामार्ग पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली. याबाबत अधिक माहिती अशी की तळकट येथिल मानसी मनोहर देसाई हिने झोळंबे व तळकट सीमेवर नारळ व सुपारी बागायत भाडेतत्त्वावर घेतली होती. त्या बागायतीत मानसी ही नेहमीप्रमाणे एकटीच सुपारी गोळा करण्यासाठी आणि बागायतीला पाणी लावण्यासाठी गेली होती. यावेळी बागायतीतील शेत विहिरीजवळ ती काही कामा निमित्त गेली असता तिचा तोल जाऊन विहिरीत पडली आणि गुदमरून तिचा मृत्यू झाला.
मानसीचा पती गोव्यातील एका स्कूल बसवर कामाला असून तो घरी आल्यावर त्याला आपली पत्नी घरी दिसली नाही. त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आजूबाजूला चौकशी केली. त्यावेळी ती बागायतीच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यावेळी तिच्या पतीने त्या बागायतीत तिचा शोध घेतला.त्यावेळी ती शेत विहिरीत मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले दोडामार्ग पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल झाले व मृतदेह बाहेर काढला तिच्या पश्चात पती दोन मुलगे असा तिचा परिवार आहे.