ता: २० जानेवारी २०२४
येथील नट वाचनालतात सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित आयोजित करण्यात आलेल्या नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटात तेजल अनिल देसाई (कळणे हायस्कुल) तर प्राथमिक गटात समृद्धी जयराम देसाई (माध्यमिक विद्यालय डेगवे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दोन्ही गटात स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
आठवी ते दहावी या माध्यमिक गटासाठी ‘माझे कुटुंब व मोबाईल’ व ‘स्त्रीची महती’ हे विषय ठेवण्यात आले होते. या गटात आर्या गणपत सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली), सान्वी सागर राऊळ (व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कुल, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. मुग्धा नारायण पंडित (मडुरा हायस्कुल) व मिताली नंदकिशोर कोठावळे (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
पाचवी ते सातवी या प्राथमिक गटासाठी ‘माझे बालपण’ व ‘माझे गुरु’ हे विषय देण्यात आले होते. ता गटात सान्वी सचिन देसाई (खेमराज हायस्कुल, बांदा) नैतिक निलेश मोरजकर (खेमराज हायस्कुल, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या गटात सारांश सुधीर शिरसाट (दिव्य ज्योती स्कुल, बांदा) व प्रणिता गोविंद सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
स्पर्धेचे उदघाटन डॉ. संजय बर्वे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले. यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, ज्येष्ठ संचालक प्रकाश पाणदरे, परीक्षक चंद्रकांत सावंत, गुरुनाथ नार्वेकर, अनंत भाटे आदी उपस्थित होते. दोन्ही गटात ४० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव राकेश केसरकर यांनी केले. आभार सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू यांनी मानले. यावेळी संचालक जगन्नाथ सातोसकर, अंकुश माजगावकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, अमिता परब यांच्यासह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.