बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक: १९ डिसेंबर २०२४
माकडांपासून शेती बागायतीचे भरपूर नुकसान करण्यात येते. नागरिक व शेतकरी यांना माकडांच्या उपद्रवापासून रोखण्यासाठी जलद कृती दलामार्फत त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचे बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहरात भरवस्तीत माकड, वानरांचा धुडगूस सुरू आहे. तसेच परिसरात शेती, बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येते. वनविभागाच्या जलद कृती दलामर्फत माकड, वानरे यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मोहीम सुरु आहे. ती कौतुकास्पद असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. तशीच कार्यवाही आपण बांदा शहरात करून माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी साईप्रसाद काणेकर यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ वाळके उपस्थित होते.
उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांनी याबाबत वनविभाग सतर्क असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी हि मोहीम राबविण्यात येत आहे. बांदा शहरात देखील लवकरच माकड पकड मोहीम राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.