सिंधुदुर्ग संपादकीय
दिनांक : ८ डिसेंबर २०२४
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील अमेझॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलारीला लाभलेले निसर्ग सौंदर्य, किल्ले, धबधबे, जंगल यासारखी नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे आहेत.ही पाहण्यासाठी अनेक लोक तिलारी परिसरात भेट देत असतात. मात्र हेमंत ऋतू मध्ये तिलारी, दोडामार्ग, बांदा परिसर हा पक्षिनिरिक्षकांसाठी स्वर्ग बनला आहे. फक्त देशातूनच नव्हे तर विदेशातील पर्यटक पक्षी निरीक्षण आणि चित्रण करण्यासाठी याठिकाणी भेट देत असतात.
यासाठी त्यांना वन्यजीव अभ्यासक व तिलारी येथील अनुभवी गाईड श्री. विकास माने यांची मदत होत आहे. विकास माने हे २०११ पासून तिलारी व जवळच्या परिसरात वन्यजीव अभ्यास, जनजागृती व संरक्षणाचे कर्तव्य पार पाडत आहेत. यासाठी त्यांना वनविभाग, स्थानिक लोक व सहकाऱ्यांची मोलाची मदत होत आहे. त्यामूळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी व परिसरातील पर्यटनाला चालना मिळत आहे.
ह्या ऋतू मध्ये अनेक देश विदेशातील पक्षी आपले स्थलांतरण करत असतात. दोडामार्ग परिसरातील तिलारी धरण प्रकल्पाच्या जवळपास घनदाट जंगलाने हा परिसर व्यापलेला असल्याने येथे बऱ्याच ठिकाणाहून आलेले पक्षी स्थिरावत असतात. याचा फायदा पक्षी निरीक्षकांना मोठ्या प्रमाणात होत असतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विदेशातून बरेचसे पक्षी निरक्षक हे सिंधुदुर्गाच्या तळ कोकणामध्ये येऊन पक्षांची छायाचित्रे व चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. पक्षी प्रेमींसाठी सध्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि दोडामार्ग परिसर साक्षात स्वर्ग ठरला आहे.