बांदा प्रतिनिधि/संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:२४ सप्टेंबर २०२४
बांदा येथील व्ही.एन.नाबर प्रशालेत संस्कृत दिनाच्या निमित्ताने संस्कृतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्कृत विषयात बी.ए. झालेले व साहित्य विशारद डिग्री असलेले श्री.नरहरी उपाध्ये सर व्यासपीठावर उपस्थित होते त्याचबरोबर संस्कृत शिक्षक श्री.तृषार कुडकेही उपस्थित होते तसेच बांदा गावचे उपसरपंच श्री.बाळू सावंत व पंचायत सदस्य श्री. शामसुंदर मांजरेकर आणि श्री. निलेश कदम यावेळी तिथे उपस्थित होते. वाय.पी.एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस.एस.पी.एम गोवाचे जनरल सेक्रेटरी श्री.त्रिविक्रम उपाध्ये सर आणि सेक्रेटरी श्री. बालेंद्र बी. सतरकर सर उपस्थित होते.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मधूर असे स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वरसुमनांनी स्वागत केले.तद्नंतर मान्यवरांनी श्री देवी सरस्वतीच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण केला व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विशेष अतिथी म्हणून लाभलेले श्री. बाळू सावंत यांनी आपले विचार व्यक्त करताना, इंग्रजी माध्यमाची शाळा असूनसुद्धा , संस्कृत सारखा विषय इथे सुरू होत आहे यासारखी दुसरी अभिमानाची बाब नाही म्हणून त्यांनी सर्वप्रथम याबद्दल शाळेचे कौतुक व अभिनंदन केले.त्यानंतर संस्कृत शिक्षक श्री.तृषार कुडके यांनी आपल्या शाळेत
संस्कृत वर्ग सुरू करूया जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल याविषयीचे विचार शाळेतून त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी सर्वप्रथम शाळेची कौतुकाने पाठ थोपटली आणि हे संस्कृतचे वर्ग सुरू करण्याचे प्रयोजन व्यक्त केले. त्यानंतर उद्घाटक श्री.नरहरी उपाध्ये सरांनी संस्कृत विषयी आपले विचार व्यक्त करताना, ही सर्वात प्राचीन भाषा असून ही भाषा प्रसिद्ध व्याकरण तज्ञ पाणिनी यांनी प्रमाणित केली होती.ही भाषा हिंदू ,जैन , बौद्ध धर्मांच्या उपासनेची भाषा आहे असेही ते म्हणाले.या संस्कृत वर्गासाठी शाळेतील नव्हे तर इतर शाळांतील विद्यार्थी, पालक व इतर कोणीही ( वयाचे बंधन नाही )जे संस्कृत शिकण्यास इच्छुक असतील त्यांनी शाळेच्या शिक्षिका सौ. सुमित्रा सावंत ( ७५८८९३३४०५ ) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका स्नेहा सुनील गावडे तर आभार सौ. दिक्षा नाईक यांनी मानले.