बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: ५ सप्टेंबर २०२४
माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून डेगवे यातील ऋषीतुल्य असे सेवानिवृत्त शिक्षक श्री वि.गो. देसाई गुरुजी यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस. के. सावंत सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डेगवे गावचे सरपंच मा. राजन देसाई, डेगवे सोसायटीचे चेअरमन तसेच शालेय समिती सदस्य श्री प्रवीण देसाई माजी उपसरपंच मधुकर देसाई तसेच देसाई गुरुजींचे सुपुत्र तसेच डेगवे हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य श्री भीमसेन देसाई उपस्थित होते. या प्रसंगी श्री वि. गो. देसाई गुरुजी यांच्या कुटुंबीयमार्फत शाळेला उपयोगी अशी रु.११००० किमतीचे प्रयोगशाळा साहित्य व उपकरणे भेट स्वरूपात देण्यात आली. या प्रसंगी बोलताना देसाई गुरुजींनी संस्कारक्षम शिक्षण हे केवळ मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणातूनच मिळते. सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेतून घेतले तर इतर भाषा शिकताना त्याचा नक्की फायदा होतो, असे प्रतिपादन केले. यावेळी इयत्ता ५वी व ८वी तील गणित संबोध परीक्षेला गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ यशोदा देसाई मॅडम यांनी केले.