आताच शेअर करा

दिनांक:२६/११/२०२६


 बांदा:   मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांदा एसटी  स्टँड ते बांदा पोलीस चेक पोस्ट या दरम्यान स्वतंत्र सर्व्हिस रोड तयार करून द्यावा, अशी मागणी बांदा विकास आघाडीच्या सावंतवाडी पंचायत समिती सदस्य सौ. ऋतिका संदेश नाईक यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी कार्यालयाचे शाखा अभियंता श्री. रुपेश कांबळे यांना नुकतेच दिले. यावेळी त्यांच्या सोबत मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, निखिल मयेकर, विठ्ठल वाळके, ओमकार नाडकर्णी व बांदा विकास आघाडीचे सदस्य उपस्थित होते.
   निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गावरील या भागातून स्थानिक नागरिक, वाहनचालक, शेतकरी आणि पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. प्रवास करताना स्थानिक नागरिकांना तसेच शेतीची अवजारे घेऊन जा-ये करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महामार्गावरील वाढती वाहतूक, वाहनांचा वेग आणि स्थानिक वाहतुकीची वर्दळ पाहता येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही अनेक वेळा येथे अपघात झाले आहेत. त्यामुळे बांदा शहराच्या सोयीच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पट्ट्यात स्वतंत्र सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. या निवेदनावर बांदा परिसरातील अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed