आताच शेअर करा

दिनांक:२५/११/२०२६

तळवणे प्रतिनिधी:शंकर गावडे

तळवणे (सावंतवाडी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावचे सुपुत्र आणि कोकणच्या लोककलेचा समृद्ध वारसा जपणारे ज्येष्ठ दशावतारी कलाकार श्री. व्यंकटेश चंद्रकांत तळवणेकर (वय ५८) यांचा डोंबिवली येथे विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा आणि दशावतारी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला. तळवणे गावाचे नाव कलाक्षेत्रात उंचावणाऱ्या या कलावंताच्या गौरवामुळे संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.  

कलेची निस्वार्थ सेवा आणि प्रेरणादायी प्रवास
     दशावतार नाट्यमंडळांच्या अडचणीच्या काळातही केवळ प्रसिद्धीसाठी न जगता, एक ‘कलासेवक’ म्हणून रंगभूमीची सेवा करणारे व्यंकटेश तळवणेकर आज नवोदित कलाकारांसाठी मोठा आदर्श ठरले आहेत. तळवणे गावातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद आहे. शालेय जीवनात नववीत असताना ‘मणिमालासूर’ या नाटकात भगवान शंकराची भूमिका साकारत त्यांनी आपल्या अभिनयाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे विविध नाट्यमंडळांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. 

‘रेवणनाथ जन्म’ आणि विविध भूमिकांतून रसिकांवर मोहिनी
    १९९२ मध्ये डोंबिवलीतील भारत नाट्य मंदिरात ‘एस. कुमार दशावतार नाट्यमंडळ, तळवणे’ यांच्या ‘रेवणनाथ जन्म’ नाटकातील त्यांच्या भगवान शंकराच्या भूमिकेने विशेष दाद मिळवली होती. कल्याण-डोंबिवलीचे प्रथम महापौर श्री. शाहू सावंत यांच्या हस्ते त्यांचा झालेला गौरव त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. शंकर, देवेंद्र, ब्रम्हदेव, विकलासुर, ब्राम्हण, ब्रम्हाराक्षस अशा विविध व्यक्तिरेखांसह ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘श्री क्षेत्रपाल वेतोबा’ या मालिकांमधूनही त्यांनी रंगभूमीसोबतच छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमटवला. 

मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
    लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे सचिव श्री. गजानन गावकर यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला; तर अध्यक्ष डॉ. श्री. निलेश श्रीधर मुळीक, श्री. संतोष कोळंबकर, श्री. सचिन सापळे आणि श्री. अर्जुन आईर आदी मान्यवर उपस्थित होते. कलेच्या निष्ठेचा झालेला हा सन्मान त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी मोठी ऊर्जा देणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed