आताच शेअर करा

दिनांक:२४/१०/२०२६

बांदा:गोवा-पत्रादेवीजवळ दुसगी पेट्रोलपंप परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात सरमळे येथील मंगेश रघुनाथ गावडे (वय ५५) यांचे निधन झाले. या घटनेमुळे गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सरमळे गावात शोककळा पसरली आहे.

मंगेश गावडे हे शुक्रवारी रात्री कामानिमित्त गोव्यात गेले होते. पत्रादेवीजवळील दुसगी पेट्रोलपंप परिसरात ते रस्ता ओलांडत असताना गोव्याहून बांद्याच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या साहिल तारी यांच्या दुचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात गावडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र त्यांचे निधन झाले.

शनिवारी सकाळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव सरमळे येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने त्यांच्या घरी धाव घेत गावडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मंगेश गावडे हे मनमिळावू आणि हसतमुख स्वभावासाठी परिचित होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. सखाराम गावडे यांचे ते भाऊ, तर सरमळेचे सरपंच विजय गावडे यांचे सख्खे चुलत भाऊ होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *