
बांदा येथे दहीहंडी उत्सवाची माहिती देताना राजू खान मित्रमंडळचे पदाधिकारी व कार्यकर्ते
दिनांक ३०/०८/२०२६
बांदा:जन्माष्टमीनिमित्त बांदा येथे राजू खान मित्रमंडळाच्यावतीने रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कट्टा कॉर्नर येथे रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या सोहळ्यात १ लाख ११ हजार १११ रुपयांची भव्य दहीहंडी हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
दहीहंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी थरानुसार विशेष पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. ८ थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला २१ हजार रुपये, ७ थरांची सलामी देणाऱ्या पथकाला ११ हजार रुपये, तर ६ थरांची सलामी देणाऱ्या पथकाला ५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे विविध गोविंदा पथकांमध्ये थरांची चुरस पाहायला मिळणार आहे.
बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दहीहंडी उत्सवाची माहिती देण्यात आली. यावेळी राजू खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, माजी सरपंच बाळा आकेरकर, माजी उपसरपंच बाळु सावंत, संदीप बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, सुनील धामापूरकर, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, साई सावंत, अर्णव स्वार, साईश मोर्ये, तुषार मांजरेकर, प्रथमेश पडवळ, गणेश सावंत आदी उपस्थित होते.
दहीहंडी सोहळ्यात डीजेच्या तालावर गोविंदा पथकांच्या थरांची रोमांचक सलामी पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार असून, उत्साह आणि जल्लोषाने परिसर दुमदुमणार आहे. कार्यक्रमाच्या निवेदनाची संपूर्ण जबाबदारी मालवणी ढंगातील प्रसिद्ध निवेदक बादल चौधरी यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्या खास मालवणी शैलीतील उत्स्फूर्त निवेदनामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे.
विशेष म्हणजे, या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व गोविंदा पथकांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे सहभागी पथकांचा उत्साह वाढणार आहे. बांदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कट्टा कॉर्नर येथे होणाऱ्या या भव्य दहीहंडी सोहळ्यास नागरिक, गोविंदा पथके तसेच कृष्णभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची रंगत वाढवावी, असे आवाहन राजू खान मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांकडून थरांच्या सलामीची तयारी सुरू झाली असून, आकर्षक पारितोषिके, डीजेचा ताल आणि मालवणी निवेदनामुळे यंदाचा दहीहंडी सोहळा लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी बाळा आकेरकर (मो. 9422392831) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
