
दिनांक:०२/०५/२०२६
बेळगाव / सिंधुदुर्ग:
साहित्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील एक अभिमानास्पद सोहळा यंदा कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे प्रथमच संपन्न होणार आहे. ९८ व्या भव्य राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन १६ मे २०२६ रोजी करण्यात आले असून, या ऐतिहासिक सोहळ्यात सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि साहित्यिक संतोष दत्ताराम चिले यांना मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या फाऊंडेशनचा पुढाकार
विशेष म्हणजे, हे संमेलन आयोजित करणारे ‘डॉ. सुरेश डी. एस. राठोड फाऊंडेशन’ हे परदेशातील दूतावासामध्ये आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्याचा बहुमान मिळालेले भारतातील पहिले फाऊंडेशन आहे. सर्किट बेंच फाऊंडेशन, शांतीदूत परिवार, इंडियन पोलीस मित्र भारत आणि विशेष कार्यकारी अधिकारी न्याय हक्क जनजागृती फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘९डी’ (9D Visual Experience) दर्जाचा भव्य सोहळा पार पडणार आहे.
संतोष चिले यांनी आपल्या लेखणीतून केवळ शब्दरचनाच केल्या नाहीत, तर त्या शब्दांना कृतीची जोड दिली आहे. त्यांनी अनाथ आश्रम, रस्त्यावरील भिक्षुक आणि मुक्या प्राण्यांची कोणत्याही प्रसिद्धीविना केलेली निःस्वार्थ सेवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य पैलू आहे.
कवी मनाची सामाजिक बांधीलकी असलेले “समाज सेवा हीच खरी उपासना” हे ब्रीद सार्थ ठरवणाऱ्या चिले यांच्या कार्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
इतिहास घडवणाऱ्या या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी साहित्यप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता असून, संतोष चिले यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
