आताच शेअर करा

दिनांक: १३/०३/२०२६

सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे औचित्य साधून मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने केंद्रशाळा मळगाव (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा) येथे शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे, नव्या पिढीला ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम बनविणे, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि शिवकालीन वारशाची जाणीव करून देणे या मुख्य उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमावेळी शिवशंभू गृपचे खजिनदार सुनील राऊळ, सचिव ज्ञानेश्वर राणे, सुधीर राऊळ, उपाध्यक्ष प्रथमेश राणे, सहदेव राऊळ, नितिन गावडे, शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गवस, शिक्षिका दीपश्री सावंत, गीता जाधव, शिवशंकर तेली, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गौरी कुडव, उपाध्यक्षा वैशाली पाटकर, सदस्य, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये मराठा शस्त्रागारातील मराठा धोप, दांडपट्टा, कट्यार, बिचवा, वाघनखे, खंडा तलवार, नागीन तलवार, ढाल, जिरेटोप, तोफेची प्रतिकृती तसेच शिवकालीन ऐतिहासिक संदर्भग्रंथ मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले.
यावेळी इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना शिवकालीन वस्तूंची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. अफजलखान वधावेळी वापरण्यात आलेल्या वाघनखांची माहिती सांगताना त्यांनी तो ऐतिहासिक प्रसंग जणू प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभा राहील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तसेच विविध दुर्गांची माहिती देत शिक्षणात्मक सत्रही घेण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिवकालीन शस्त्रे हाताळून त्यांची माहिती व अनुभव घेतला. तसेच गृपचे पदाधिकारी सुनील राऊळ व सुधीर राऊळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिवकार्याचे महत्त्व आणि सध्याच्या काळात मुलांवर चांगले संस्कार होणे किती आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका दीपश्री सावंत यांनी आभार मानताना, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळत असल्याने शिवशंभू ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले. तसेच बलिदान मासानंतरही अशा प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे गृपच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *