
दिनांक: १२/०३/२०२६
सावंतवाडी : सावंतवाडी सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने त्या जागी तळवडे पंचायत समिती विभागाच्या सदस्या सुश्मिता जाधव यांचे नाव निश्चित असतानाच आता उपसभापती पदासाठी भाजपकडून मळगाव पंचायत समिती विभागातून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य गौरव मुळीक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजप नेते खा. नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी त्यांचे नाव निश्चित केल्यानंतर सावंतवाडी भाजपा कार्यालयात त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाचिटणीस महेश सारंग, पंचायत समिती गटनेते महेश धुरी, मंदार कल्याणकर, नगरपरिषद सभापती आनंद नेवगी, मधुकर देसाई, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी, सदस्या प्राजक्ता केळुसकर, नेहा कांबळी आदी उपस्थित होते.
सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत असून ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पंचायत समिती सभापतीपद हे सुष्मिता जाधव या एकमेव अनुसूचित जातीच्या सदस्या असल्याने निश्चित झाले आहे. तर भाजपकडून आता गौरव मुळीक यांचे नाव निश्चित झाल्यामुळे निवडणुकीची औपचारिकता शिल्लक राहिली असून ही निवडणूक बिनविरोध होणार आहे आता निश्चित झाले आहे.
