आताच शेअर करा

दिनांक: २६/०२/२०२६

सावंतवाडी:सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी व योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ९ दुर्गम गावात सकाळच्या सत्रात गेले दिड वर्ष कार्यान्वित असलेल्या ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरत्या वैद्यकीय पथकाची आता सायंकाळच्या सत्रातील मोफत वैद्यकीय सेवा सोमवार २ मार्च पासून सुरू होत आहे. न्हावेली, सोनुर्ली,  वेत्ये, कास, सातोसे, निगुडे, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, नेतर्डे या दहा गावांमध्ये फिरत्या दवाखान्यात रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
        डॉ प्रविणकुमार ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुमित्र प्रतिष्ठानने स्थापनेपासुनच जनसामान्यांच्या सेवेचे व्रत जोपासत आहे. ग्रामीण व दुर्गम भागात सातत्याने आरोग्य शिबिरे घेण्यासह कोरोना काळातही प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य शिबिरासह इतर मोफत सुविधा व प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले. गेली अनेक वर्षे  शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेट्ये यांचे शिव व्याख्यान आयोजीत करण्यासह शैक्षणिक, सामजिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात प्रतिष्ठान सेवारत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कृती समिती स्थापन करून दिलेले योगदान सर्वश्रुत आहे.
          घरी उपचार घेत असलेल्या तसेच वयोवृद्ध रुग्णांची देखील सेवा घडावी, या उद्देशाने ‘वापरा व परत करा’ या तत्वावर  “डॉ डी बी खानोलकर रुग्ण सेवा केंद्र” सुरू केले आहे. सन २०१८ पासुन आतापर्यंत शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेतलाच शिवाय या केंद्रात उपलब्ध असलेली ‘शितशव पेटी’ शेकडो गरजूंना उपयोगी ठरली आहे. याच समाजसेवेतील पुढचे पाऊल म्हणुन सिंधुमित्र प्रतिष्ठानने दीड वर्षांपूर्वी मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई यांच्या सहकार्याने  “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” फणसवडे, केसरी, दाणोली, पारपोली, देवसू, ओवळीये या गावांसह आंबेगाव, कुणकेरी या ९ दुर्गम गावासाठी सुरू केले.
          समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, नव्हे ती आपली जबाबदारी आहे, या सामाजिक जाणिवेतून या दोन्ही संस्था कार्यरत आहे. या सेवाभावी संस्थांतर्फे गेल्या अडीच वर्षांपासून अनेक उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. 

दीड वर्षात १०५०० रुग्णांची निःशुल्क तपासणी

योग विद्या प्राणिक हिलींग फाऊंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक मास्टर चौआ कॉक सुई होते. त्यांच्या नावे हा फिरता दवाखाना कार्यरत आहे. सध्या हा फिरता दवाखाना रोज सकाळी ८ वाजता सावंतवाडीतून सुटल्यानंतर दोन ते तीन गावे करून दुपारी १ च्या सुमारास सावंतवाडीत येतो. हा फिरता आठवड्यातून दोनवेळा गावात जातो. दर रविवार आणि महत्वाचे सण वगळता हा फिरता दवाखाना रुग्णांना सेवा देत आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांसाठी आरोग्य सेवा अजूनही दूर आणि महागडी आहे. अशा परिस्थितीत या फिरत्या दवाखान्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून गावातच निःशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे. गावातच मोफत उपचार मिळाल्याने हजारो रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापूर्वी आजारावरील उपचारांसाठी तालुक्याच्या गावी जावे लागत होते. त्यात प्रवासासह वेळ आणि पैसा खर्च व्हायचा. परंतु आता हा फिरता दवाखाना गावातच येत असल्यामुळे वेळीच उपचार होतात. त्यात कित्येक गोरगरीब रुग्णांना तपासणीसह औषधांचा खर्च परवडत नव्हता. मात्र, या फिरत्या दवाखान्यातून तपासणीसह औषधेही मोफत मिळत असल्यामुळे त्यांचा मोठा आर्थिक भार कमी झाला आहे.
त्यामुळे हा फिरता दवाखाना या आठ गावांमध्ये आरोग्य सेवेचा आधारस्तंभ ठरला असून ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी आदर्श मॉडेल सर्वासमोर ठेवले आहे.

सेवेचा महत्वाचा दुवा
डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे आणि त्यांचे सहकारी या प्रतिष्ठानच्या स्थापनेपासूनच गेली १४ वर्षे जनसामान्यांच्या सेवेचे व्रत जोपासत आहेत. निःस्वार्थी भावनेने सावंतवाडी शहरासह ग्रामीण ते अतिदुर्गम भागात सातत्याने आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवितात. आपल्या परिचयाच्या अनेक स्वयंसेवी संस्थांच्या विविध उपक्रमांचा लाम ते गरजवंतांना मिळवून देतात. त्यामुळे डॉ. प्रवीणकुमार ठाकरे गोरगरिबांसह गरजवंतांचे आश्रयदाते बनले आहेत. याच समाजसेवेतील पुढचे पाऊल म्हणून या प्रतिष्ठानने योग विद्या प्राणिक हिलींग फाऊंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्या सहकार्याने ‘ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक’ दुर्गम भागासाठी सायंकाळच्या सत्रातही सुरू केले आहे. मुंबईतील ही संस्था डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहे. या संस्थेचे ध्येय पाहता, यापुढेही या संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ जिल्ह्यातील गरजूंना मिळवून देण्याचा मनोदय डॉ. ठाकरे यांनी व्यक्त करीत, गोरगरीब, गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्या आरोग्यसेवेची खरी पावती असून पुढील काळात या सेवेचा विस्तार करून आणखी दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.

फिरत्या दवाखान्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

दर सोमवार व गुरुवार सायंकाळी ३.०० ते ३.४५ पर्यंत न्हावेली पार्सेकरवाडी शाळा नं.  ४, सायंकाळी ४ ते ४.४५ पर्यंत न्हावेली ग्रामपंचायत, सायंकाळी ५.१५ ते ६.१५ पर्यंत सोनुर्ली माऊली मंदिर, सायंकाळी ६.३० ते ७ पर्यंत वेत्ये कलेश्वर मंदिर, दर मंगळवार व शुक्रवार सायंकाळी ३ ते ३.३० पर्यंत कास माऊली मंदिर, सायंकाळी ३.४५ ते ४.१५ पर्यंत कास दाभळवाडी, सायंकाळी ५ ते ५.४५ पर्यंत सातोसे माऊली मंदिर, सायंकाळी ६.१५ ते ७ पर्यंत निगुडे ग्रामपंचायत, दर बुधवार व शनिवार सायंकाळी ३ ते ४ पर्यंत डिंगणे माऊली मंदिर, सायंकाळी ४.१५ ते ४.४५ पर्यंत गाळेल शाळा नं १, सायंकाळी ५.१५ ते ६ पर्यंत  डोंगरपाल शाळा नं १, सायंकाळी ६.१५ ते ७ पर्यंत नेतर्डे ग्रामपंचायत.गरजू रुग्णांनी दिलेल्या वेळेतच यावे तसेच तपासणीसाठी पहिल्यांदा येताना सोबत आधारकार्ड आणावे.
          या फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत या दुर्गम भागात डॉक्टरांमार्फत रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधे देण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन दिवस हा फिरता दवाखाना या गावात जाणार असुन या फिरत्या वैद्यकीय दवाखान्याच्या  गाडीतच रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तशी या गाडीत हात धुण्यासाठी बेसिन, रुग्ण तपासणी साठी बेड, रुग्ण बसण्यासाठी बेंच, औषध विभाग, डॉक्टर व नर्स यांच्यासाठी आसन अशी व्यवस्था आहे. या फिरत्या दवाखान्याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथचे विश्वस्त सीए विवेक दोषी आणि सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed