
दिनांक: १५ सप्टेंबर २०२५
दोडामार्ग प्रतिनिधि :झोळंबे येथील सुनेश उदय गवस (३२) हा युवक दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. आपल्या एकुलत्या एक मुलासाठी मायमाऊली आई किडनी द्यायला तयार आहे. मात्र किडनी ट्रान्सफर शस्त्रक्रियेसाठी सुमारे १२ ते १४ लाख रुपयांचा खर्च त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची असून या शस्त्रक्रियेसाठी जिल्हावासीयांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी जमेल तेवढी आर्थिक मदत करावी. ही तातडीची मदत सुनेश याला नवसंजीवनी देऊ शकणार असून त्यामुळे एका कुटुंबाचा आधारही वाचणार आहे.
आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या गवस कुटुंबात सुनेशसह त्याची पत्नी, तीन वर्षाची मुलगी आणि आई आहे. वडिलांचे आकस्मित निधन झाले. सुनेश गोवा वेर्णा येथील बर्न अँड इम्पिनॉल प्रा ली या टॉवरचे अँटिना बनवण्याच्या कंपनीत कामाला होता. यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. जमीन अथवा शेतीसह अन्य उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची. पाच महिन्यांपासून सुनेशला अशक्तपणा वाटू लागल्याने तो आजाराने ग्रस्त होता. त्यानंतर निदान केले असता त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच गवस कुटुंबीय अक्षरशः कोलमडून पडले. त्यानंतर सुनेश डायलिसिसवर आहे. आपल्या पोटचा गोळा वाचण्यासाठी त्याची आई उर्मिला आपली किडनी द्यायला तयार आहे. मात्र किडनी ट्रान्सफरसाठी १२ ते १४ लाखाचा खर्च ऐकून गवस कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न त्यांना पडला आहे.
अतिशय दुर्धर असलेल्या आजाराची सुनेशला माहिती आहे. मात्र स्वतःला सावरत अजूनही तो खचलेला नाही. आपले पूर्वीचे जीवन जगण्याची त्याची इच्छा आहे. आतापर्यंत सुनेशच्या उपचारासाठी गवस कुटुंबियांनी होते नव्हते ते सर्व संपवले. सध्या या युवकासह त्याची पत्नी तीन वर्षाची मुलगी व माऊलीची स्थिती पाहिल्यावर कुणाताही गहिवरून येईल. त्यामुळे सुनेश याच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलविण्यासह त्याच्या कुटुंबीयांच्या आधारासाठी सर्व समाजमनाच्या दातृत्वाची गरज आहे. सुनेशच्या पुढील उपचारासाठी जिल्हावासीयांना मदतीसाठी हाक दिली आहे. ज्यांना सुनेश यांना मदत करावयाची आहे त्यांनी सुनेश उदय गवस ,खाते नंबर १४६५१०५१००००६६३ आय एफ एस सी कोड बी के आय डी ०००१४१० बैंक ऑफ इंडिया शाखा, बांदा या खात्यावर जमा करावी. तसेच गुगल पे नंबर 9405152275 आणि यूपीआय आयडी suneshgawas1953@okicici हा आहे. यावरही मदत देऊ शकता. अधिक माहितीसाठी रवींद्र गवस ९४२०९५०७३३ या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहनस जुळंबे क्रिकेट प्रीमियर लीगच्यावतीने करण्यात आले आहे.