दिनांक: ४ जुलै २०२५
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

जमिन खरेदी- विक्री व्यवहारातुन आरोंदा – हुसेनबाग येथील मच्छिमाऱ्यांची राहत्या जागेतून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न कारण्यात आला असून त्याचा व्यवहार एका लाभ नामक कंपनीशी करण्यात आला. आम्ही तुम्हाला स्थलांतरित करणार आहोत, आपली घरे अनधिकृत आहेत असे त्या कंपनीच्या वकिलाकडून सांगण्यात आले. याविषयी आरोंदा तलाठी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांची हरकत स्वीकारणार नाही, फेरफारची कार्यवाही पूर्ण केली जाईल असे उत्तर आरोंदा तलाठी यांजकडून देण्यात आले.
सध्या ज्या जागेमध्ये मच्छिमार बांधव राहत आहेत ती जागा गेली ४०० वर्षे त्यांच्या ताब्यात असून सद्या १५ घरे मच्छिमार बांधवांची आहेत. त्या जमीनीचा सातबारा ही त्यांच्या नावावर असून या जमिनीमध्ये कुळ असणारी व्यक्ती या जमीनीची विक्री करू पाहत आहे. आम्ही त्या जागेची विक्री करू देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्या जागेची विक्री करून त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न केला जातं आहे.
मच्छिमार बांधव यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेत ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली थेट तहसील कार्यालयाला धडक दिली व मा. तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेत आपल्याला योग्य तो न्याय मिळावा यासाठी दाद मागितली आहे.
यावेळी मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष गोकुळदास मोठे, शिवराम कोरगावकर, संतोष कोरगावकर, रामदास पेडणकर, प्रथमेश नवघरे, तुकाराम कोरगावकर, हरिश्चंद्र कोरगावकर, रघुवीर पेडणेकर, अनंत चांदेकर, भरत कोरगावकर, तसेच इतर मच्छिमार बांधव उपस्थित होते.