आताच शेअर करा

दिनांक: १२ मे २०२५

सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर

सातार्डा उत्तम स्टील कंपनी आवारात आज सकाळी बसलेल्या पट्टेरी वाघाचे दर्शन झाले.गोव्यात कामानिमित्त जाणाऱ्या युवकांना पट्टेरी वाघ निदर्शनास आला. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे मात्र सातार्डा परिसरात पट्टेरी वाघ असल्याची खातरजमा झाली..

आज सकाळी मडूरा येथील अभय परब व  सिताराम भाईप हे सकाळी  दुचाकीने गोव्यात कामानिमित्त जात  असताना बरोबर सकाळी ६:१६ मिनिटांनी एका  ठिकाणी उत्तम स्टील आवारात त्यांना पट्टेरी वाघ पायवाटे नजीक बसलेला निदर्शनास आला. यावेळी त्यांची भीतीने घाबरगुंडी उडाली. मोठ्या शिताफीने माघारी परतून अन्य पर्यायी मार्गाने ते गोव्यात कामाला गेले.

गोव्यात कामानिमित्त जाणारे दशक्रोशीतील बरेचसे मोटार सायकल स्वार तसेच चार चाकी गाड्या उत्तम स्टील कंपनी  येथील मधल्या रस्त्याने प्रवास करत असतात रात्री अपरात्री त्यांची ड्युटी संपल्यानंतर प्रवासाच्या दरम्यान ह्याच रस्त्याचा अवलंब केला जातो. त्यामुळे कामाला जाणाऱ्या नोकरदार व्यक्ती आणि ग्रामस्थांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ह्याच माळ रानावर  गुराखी आपली गुरे चारण्यास नेत असतात. पट्टेरी वाघाच्या खळबळाटाने  जनावरांचा आणि गुराख्यांचा जीवनही धोक्यात आहे.

गेली दोन वर्षे सातत्याने या भागात पट्टेरी वाघ स्थानिकांच्या नजरेस पडत आहे. वनविभाग मात्र या भागात पट्टेरी वाघ नसल्याची माहिती देत आहे. पट्टेरी वाघासह बिबट्यांची संख्याही या परिसरात लक्षणीय आहे. वनविभागाने पट्टेरी वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *