
दिनांक: १५ फेब्रुवारी २०२५
सावंतवाडी: माडखोल धरणाच्या कालवा दुरुस्ती बाबत गेल्या चार वर्षां सुमारे दोन कोटी रुपये खर्च करूनही अधिकारी वर्गासह संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदार व कर्तव्य शून्य कारभारामुळे अनेक शेतकरी या धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे येत्या पाच दिवसात धरणाच्या उजव्या व डाव्या अशा दोन्ही पाईप लाईनवर पॉईंट टु पॉईंट पाणीपुरवठा सुरू न केल्यास गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी धरणाच्या उजव्या कालव्यावर माडखोल फणसाजवळ बस स्टॉप येथे ग्रामस्थांसह आमरण उपोषण छेडण्याचा इशारा माडखोल उपसरपंच तथा सोसायटीचे चेअरमन कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांनी दिला आहे.
याबाबत पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात कृष्णा राऊळ म्हणतात, गाव मौजे माडखोल, ता. सावंतवाडी, येथील माडखोल धरण हे शासकीय मालकीचे धरण असून ते व्यापक जनहीताच्या दृष्टीने शासनाने करोडो रूपये खर्च करून उभारलेले आहे. सदर माडखोल धरणावर कालवे बांधून सदर धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोचविण्याची आपली कायदेशीर जबाबदारी आहे. परंतू सदर धरणाचे पाणी माडखोल गावातील शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोचत नसल्याने गावातील शेतकऱ्यांनी व राजकीय पुढाऱ्यांनी शासन दरबारी अर्ज, विनंत्या व प्रसंगी उपोषणे करून सदर धरणाचे पाणी कालव्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी २२५ भरगोस असा निधी मिळविला. त्याचाच एक भाग म्हणून माडखोल डाव्या व उजव्या कालव्यासाठी रूपये २ कोटी मात्र असा भरगोस निधी सन २०१९ मध्ये उपलब्ध.झाला. परंतू खेदनीय बाब अशी की, आपल्या उदासीन, निद्रीस्त, बेजबाबदार व अकार्यक्षम कारभारामुळे सदर निधिचा अपव्यय होऊन सदर डाव्या व उजव्या कालव्याचे कामकाज मागील पाच वर्षातही पूर्ण होऊ शकलेले नाही व त्यामुळे आमच्या माडखोल गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी धरण असूनही वणवण सहन कराव्या लागत आहेत. सदर रूपये २ कोटी निधीचा वापर करून डाव्या व उजव्या कालव्यासाठी सन २०२२ मध्ये आणलेले सामान देखील जंगल परीसरात तसेच्या तसे पडून सडून जात आहे. त्यातही दुष्काळात तेरावा महीना या उक्तीप्रमाणे माडखोल गावच्या शेतकऱ्यांचे दुर्दैव असे की, सन २००९ मध्ये ढगफुटी सदृष पाऊस होऊन मुख्य कालवा वाहून गेला त्याबाबतीत देखील आपण योग्य ती तजवीज न केल्याने माडखोल गावचे ३३० शेतकरी सन २०२३ पर्यंत पाण्याविना वंचित राहीले ही वस्तुस्थिती आहे. सन १९९६ मध्ये आपल्या कार्यालयाच्या असलेल्या योग्य धोरणामुळे व आपले कार्यालय स्थानिक ग्रामपंचायतीशी साधत असलेल्या समन्वयाने शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी पुरवठा सुरू होता. मात्र आता आपल्या उदासीन, निद्रीस्त, बेजबाबदार व अकार्यक्षम कारभारामुळे गावातील ३३० शेतकऱ्यांपैकी केवळ ५० शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या हीतासाठी करोडो रूपये खर्च करून माडखोल धरण उभारले परंतू सदरच्या भल्यामोठ्या धरणातून केवळ ५० शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणे व उर्वरीत संपूर्ण गावातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होणे ही बाब अतिशय दुदैवी आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी रूपये २ कोटी एवढा भरगच्च निधी पूरवूनही केवळ आपल्या अकार्यक्षमतेमुळे व उदासिन धोरणामुळे गावातील शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे गावातील ग्रामस्थ आपल्या उदासीन, निद्रीस्त, बेजबाबदार व अकार्यक्षम कार्यभाराबाबत नाराज असून आपल्या विरूद्ध कारवाईसाठी उपोषणाच्या तयारीत आहेत.
सन २०१९ मध्ये माडखोल डाव्या व उजव्या कालव्याचे कामकाज सुरू होऊन ते अद्यापही का पूर्ण होऊ शकलेले नाही. सन २०२३ मध्ये मेंढाचे गाळू ते पंटाचे खळे/बोडणाचे गाळू या क्षेत्रासाठी आपण वेगळी प्रक्रीया करून ती रक्कम कुठे व कशासाठी खर्च केली तसेच वरकोंडवाडी केसरकर यांचे घरालगत सन २०२२ ते २०२३ सालात शासकीय कामाचे जंगलात अद्याप पर्यंत पडून सडत असलेले लाखो रूपयांचे सामान कोणत्या कारणामुळे व कोणाच्या चुकीमुळे सडत आहे, त्यास जबाबदार कोण तसेच माडखोल डाव्या व उजव्या कालव्याचे काम कधी पूर्ण होणार असे बरेच प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेले आहेत. तरी आपण त्याबाबत त्वरीत आठ दिवसात लेखी खुलासा करावा. तसेच सदर जंगलात पडून सडत असलेल्या पाईपची आमच्या समक्ष प्रत्यक्ष पाहणी करावी. अन्यथा आपण शानाच्या रूपये २ कोटी मात्र निधीचा अपव्यय करून सदर निधीची रक्कम हडप करण्याच्या कुटील इराद्याने जाणुन बुजून सदर माडखोल डाव्या व उजव्या कालव्याचे कामकाज पूर्ण करत नाही आहात, तसेच आपल्या उदासीन, निद्रीस्त, बेजबाबदार व अकार्यक्षम कारभारामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याला वणवण करावी लागत आहे याबाबत खास ग्रामसभेत ठराव घेवून तो शासन दप्तरी पुढील कारवाईसाठी सादर केला जाईल याची आपण नोंद घ्यावी.
तसेच दिनांक २०/१२/२०२४ रोजी आपण श्री देवी पावणाई मंदीर माडखोल येथे हंगामपूर्व बैठकीचे आयोजन करून त्यात आपण माडखोल गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पर्यंत पाईप लाईन घालून पाणी पुरवठा करण्याची योजना राबबिली असल्याचे सांगितलेले होते. परंतू त्याच्या पूर्ततेबाबतही आपण अद्यापपर्यंत सक्षम पाऊल उचललेले दिसून येत नाही. तरी आपण आपला उदासीन, निद्रीस्त, बेजबाबदार व अकार्यक्षम कारभार सोडून पुढील पंधरा दिवसात उजव्या व डाव्या अशा दोन्ही पाईप लाईनवर पॉईंट टु पॉईंट पाणीपुरवठा आमच्या समक्ष सुरळीत चालू करून दाखवावा अन्यथा जनहीतासाठी गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांसह आमरण उपोषण छेडण्याचा इशारा उपसरपंच तथा सोसायटीचे चेअरमन कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांनी दिला आहे.