
सातार्डा प्रतिनिधी :संदीप कवठणकर
दिनांक:२९/११/२०२६
सातार्डा: सातार्डा गावातील काराखांडी वाडी परिसरातून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात अज्ञात व्यक्तीकडून काहीतरी टाकण्यात आल्याने नदीचे पाणी दूषित झाल्याची घटना समोर आली आहे. या दूषित पाण्यामुळे नदीतील मोठ्या प्रमाणातील मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत.
विशेष म्हणजे, या नदीच्या पाण्याचा वापर परिसरातील चार वाड्यांमधील ग्रामस्थांकडून दैनंदिन कामांसाठी केला जातो. कपडे धुणे, गुरांना पाणी पाजणे तसेच इतर गरजांसाठी या पाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांमध्ये या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून नदी परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सातर्डा येथील पत्रकार संदीप कवठणकर तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान नदीच्या प्रदूषणाची परिस्थिती आणि त्याचे संभाव्य परिणाम यांची माहिती घेण्यात आली. संबंधित घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील स्तरावर पाठपुरावा करून पाणी प्रदूषित होण्यामागील कारण शोधणे आणि योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
चार वाड्यांच्या पाणीवापराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन नदीच्या पाण्याची तपासणी करावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
