आताच शेअर करा

दिनांक:२६/१०/२०२६

बांदा:आई म्हणजे माया, वात्सल्य, संस्कार आणि आयुष्यभराची सावली. हीच आईची माया आणि तिच्या आठवणी कायम हृदयाशी जपण्यासाठी राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी आपल्या मातोश्री सुमन दशरथ पाटील यांच्या निधनानंतर अस्थी झाडांच्या मुळाशी अर्पण करून एक भावस्पर्शी सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविला.            शिवनगे ता. चंदगड या गावी
मातोश्रींच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींनी पाटील कुटुंबीयांच्या मनात निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नसली, तरी त्यांच्या स्मृतींना निसर्गाच्या सान्निध्यात कायमस्वरूपी जपण्याचा निर्णय घेण्यात आला. अस्थी झाडांच्या मुळाशी अर्पण करताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि मनात आईसोबतच्या असंख्य आठवणी दाटून आल्या.
जन्मापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मायेची सावली देणारी आई आज शरीराने सोबत नसली, तरी तिचे संस्कार, तिचे शब्द आणि तिची माया कायम सोबत राहणार आहे. ज्या मातीत तिच्या अस्थी अर्पण करण्यात आल्या, त्याच मातीतून उद्या हिरवी पालवी फुटेल, झाडे बहरतील आणि त्यांच्या सावलीत आईचीच माया अनुभवता येईल, अशी भावनिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पानांची सळसळ, फुलांचा सुगंध आणि झाडांची सावली यामध्ये आईच्या प्रेमाची आठवण सदैव जिवंत राहावी, या भावनेतून या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. ‘आईच्या अस्थी झाडांच्या मुळाशी अर्पण केल्या; मात्र तिच्या आठवणी आणि संस्कार मनाच्या मुळाशी कायमचे रुजवले,’ अशी भावना पाटील कुटुंबीयांनी व्यक्त केली.
मातोश्रींच्या स्मृतींना वृक्षसंवर्धनाची जोड देणारा हा उपक्रम केवळ श्रद्धांजली न राहता आईच्या प्रेमाचे निसर्गाशी जोडलेले एक जिवंत स्मारक ठरणार आहे. भावनिक संवेदना आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *