
दिनांक: १८/१०/२०२६
सावंतवाडी:२१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे दिंडीचा समारोप.
जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने तसेच श्रींच्या ६०व्या जन्मोत्सव वारी निमित्त पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ‘वसुंधरा पायी दिंडी २०२६’ श्रीक्षेत्र गोवा येथून १० आँक्टोबर २०२६ रोजी श्रीक्षेत्र नाणीजधाम, जिल्हा रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. या दिंडीत हजारो भाविक सहभागी झाले असून, २४३ किलोमीटरचा पायी प्रवास करून ही दिंडी २१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे पोहोचणार आहे.
जागतिक तापमानवाढीबाबत जनजागृती करणे, वृक्षसंवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि स्वच्छतेचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दिंडीच्या प्रवासादरम्यान दररोज वृक्षारोपण केले जात असून, मार्गावर कचरा होऊ नये यासाठी विशेष स्वच्छता पथक कार्यरत आहे. पर्यावरणपूरक व्यवस्थापनासोबतच भाविकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेचीही विशेष काळजी घेतली जात आहे.
दिंडीतील भाविकांची उपस्थिती विशेष ॲप आणि QR कोडच्या माध्यमातून दिवसातून पाच वेळा नोंदवली जाते. तसेच, भाविकांसाठी वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेली वसुंधरा पायी दिंडी ही केवळ धार्मिक पदयात्रा नसून पर्यावरण संरक्षण, सामाजिक सेवा आणि जनजागृती यांचा सुंदर संगम आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी आणि स्वच्छ व हरित भविष्याच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, हा या दिंडीचा संदेश आहे.
