आताच शेअर करा

दिनांक: १६/१०/२०२६

बांदा : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजरा करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त सह्याद्रीच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या विद्यार्थ्यांनी बांदा येथील ऐतिहासिक नट वाचनालयाला भेट देत पुस्तकांच्या समृद्ध विश्वाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, पुस्तकांशी मैत्री दृढ व्हावी आणि अवांतर वाचनाची सवय लागावी, या उद्देशाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
      नट वाचनालयाच्या संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने घारपी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे आपुलकीने स्वागत केले. विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील कथा, चरित्रे, बालसाहित्य, ज्ञानवर्धक व प्रेरणादायी पुस्तके तसेच विविध वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची पुस्तके निवडून सलग दोन तास अवांतर वाचन केले. पुस्तकांच्या सहवासात रमलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कुतूहल विशेष लक्षवेधी ठरले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे घारपी शाळेतील उपस्थित १०० टक्के विद्यार्थ्यांनी सभासद फी भरून नट वाचनालयाचे सभासदत्व स्वीकारले. नियमित वाचनाची सवय जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला हा पुढाकार वाचन संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाला प्रोत्साहन देत वाचनालयाच्या संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने विद्यार्थी व शिक्षकांसाठी अल्पोपहाराचीही आपुलकीने व्यवस्था केली. तसेच ‘आनंदी कोल्ड्रिंक्स’चे मालक नाना शिरोडकर यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे तसेच स्वयंपाकी मदतनीस संचिता सावंत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
भारताचे ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासोबतच ज्ञानाच्या मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या जयंतीदिनी घारपीच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी जोडलेले हे नाते त्यांच्या ज्ञानप्रवासाला नवी दिशा देणारे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed