
दिनांक: १५/०४/२०२६
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
तळवणे: श्री देवी माऊली मंदिर तळवणे येथे कलशारोहण व पुनः प्रतिष्ठापना सोहळा 18 एप्रिल पासून सुरु होत असून या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तळवणे येथील श्री देवी स्वयंभू माऊली चा इतिहास सांगायचा झाला तर ज्या ठिकाणी आता माऊलीच मंदिर आहे त्याच ठिकाणी एक भली मोठी राय होती. त्या राय मध्ये एक गाय जाऊन दुधाचा पान्हा सोडायची. हा तिचा कार्यक्रम सतत चालू असायचा. काही ग्रामस्थांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर ग्रामस्थांनी चौकशीसाठी देवाला कौल लावल्यानंतर तिथे देवस्थानिक बाब असल्याचे सांगण्यात आले. ती देवस्थानिक बाब म्हणजेच श्री देवी स्वयंभू माऊली असल्याचे लक्षात आले. श्री देवी माऊली ही रुजीव असल्यामुळे तिची उंची ही दिवसें दिवस वाढत जायची तर गावकऱ्यांनी कौल मार्गाने ही उंची ठराविक मर्यादेपर्यंत स्थिर करण्याची विनंती केली व ती मान्य झाली. तेव्हापासून आतापर्यंत श्री देवी माऊलीची उंची न वाढता ठराविक मर्यादेत स्थिर झालेली आहे. तिथे त्याच ठिकाणी मोठं वारूळ होत त्या वारुळातूनच श्रीदेवी माऊलीच दर्शन झालं अस जाणकार मंडळी कडून सांगण्यात येते. अशाप्रकारे श्री देवी माऊलीच्या दर्शनाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले व श्री देवी माऊलीच्या दर्शनाने तळवणे गाव पूर्णपणे पावन झाला .
या कार्यक्रमानिमित्त 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी आठ वाजता यजमान देहशुद्धी अंगभूत पंचगणाहून कुशमांडहोम गणपती पूजन, पुण्याहवाचनादी, आचार्य वरण, शांतिसुक्त जप, स्थल प्रकार शुद्धी तसेच सायंकाळी साडेसात वाजता गुरुकृपा मित्र मंडळ तळवणे मठवाडी पुरस्कृत “भजन संध्या” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायक श्री.शुभम नाईक यांचा सुमधुर भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी छोटे मोठे धार्मिक विधी होणार आहेत त्याचबरोबर सायंकाळी सात ते नऊ सुमधुर संगीत मैफिल हा कार्यक्रम होणार आहे व रात्री 10. 00 वा. वैभवी क्रिएशन डिचोली निर्मित अमर पालकर प्रस्तुत दोन अंकी धमाल विनोदी मराठी विनोदी नाटक जावई silent सासूबाई violent हा नाट्य प्रयोग होणार आहे याचे पुरस्कर्ते आहेत श्री देवी माऊली नाट्य मंडळ, तळवणे. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 07.00 ते 09.00 श्री देव रवळनाथ सांस्कृतिक कला मंडळ नाईक वाडा, पालये पेडणे – गोवा यांचा ढोलकी भजन मंडळ कार्यक्रम होणार असून श्री आबा शेटकर यांजकडून हा कार्यक्रम पुरस्कृत करण्यात आला आहे. रात्री 10.00 वाजता “षडयंत्र” हा नाट्य प्रयोग सादर केला जाणार आहे.मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी 06.00 ते 09.00 वा. “सुरसंगम” हा कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री 10.00 वा. लिंगेश्वर कला क्रीडा -मंडळ,पालवाडी- तळवणे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक तीन अंकी “गगनात घुमली शिवगाथा ” हा नाट्यप्रयोग होणार आहे. बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी “कलशारोहण” होणार आहे. व रात्री 10.00 वा. नवयुवक नाट्यसंपदा तळवणे दोन अंकी महान ऐतिहासिक ” करीन ती पूर्व ” नाट्यकृती सादर होणार आहे. गुरुवार दि. 23 एप्रिल 2026 रोजी अनेक विधी होणार आहेत. रात्री 9:00 वाजता लॉटरी सोडत निकाल व बक्षीस वितरण होणार आहे. रात्री 10.00 वा. मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळांचा नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी 07.00 वा. विराजमान श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.
अशाप्रकारे भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा श्री देवी माऊली पूर्वप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहणाचा सोहळा दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी ते गुरुवार दिनांक 23 एप्रिल पर्यंत सुरू असणार आहे. तरी या कार्यक्रमास महाराष्ट्र तसेच गोव्यातील व गावाच्या आजूबाजूच्या दशक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या क्षणाचा व माऊली देवीचा प्रसाद रुपी आशीर्वाद घेण्यासाठी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी माऊली कला क्रीडा मंडळ, तळवणे तसेच गावातील सर्व स्थानिक मानकरी यांच्याकडून करण्यात आले आहे.
