आताच शेअर करा

दिनांक: ०४/०३/२०२६

कुडाळ : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत अमृतानुभव फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘विश्व मराठी भाषा कृतज्ञता संमेलन २०२६’ अत्यंत दिमाखात आणि उत्साहात आयोजित करण्यात आले. मराठी भाषेचा गौरव, तिच्या संस्कृतीचा सन्मान आणि राष्ट्रनिर्मितीत भाषेच्या योगदानाचा जागर यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरला.
या भव्य संमेलनात विविध क्षेत्रांत मराठी भाषा, संस्कृती आणि समाजासाठी उल्लेखनीय, प्रेरणादायी व आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. त्याच अनुषंगाने ‘मराठी समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. यावर्षीचा हा मानाचा पुरस्कार सौ. मानसी महेश परब – राणे यांना बहाल करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, तिच्या प्रसारासाठी तसेच समाजप्रबोधनासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्यातून भावी पिढीस प्रेरणा मिळावी आणि समाजापर्यंत त्यांच्या योगदानाची व्यापक पोहोच व्हावी, हा या सन्मानामागील मुख्य हेतू होता.

शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रकार भवन, गंजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुप्रसिद्ध पार्श्वगायक सारंगम ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्यामुळे सोहळ्याला विशेष दिमाख प्राप्त झाला. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध वक्ते व युवा उद्योजक राहुल पाटील, चित्रपट निर्माता व लेखक तसेच अमृतानुभव फाउंडेशन, पुणेचे अध्यक्ष संदीप राक्षे,  स्वागताध्यक्ष व आयोजक प्रा. डॉ. बी. एन. खरात, तसेच निवेदक प्रा. डॉ. सुनील धनगर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
सौ. मानसी महेश परब–राणे यांना ‘मराठी समाजभूषण पुरस्कार’ प्राप्त झाल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव अभिमानाने केला जात आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनी मराठी भाषेचा दीप अधिक तेजोमय होवो, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed