आताच शेअर करा
डॉ शिवरत्न शेटे

सावंतवाडी प्रतिनिधी

दिनांक: ११ जानेवारी २०२५



सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने
प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे
रविवारी १२ जानेवारी रोजी सावंतवाडीत येत आहेत. सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात  होणाऱ्या  ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानात लढवय्या ताराराणींच्या अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात ते मांडणार आहेत.
        ताराराणी या मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी विवाह होऊन त्या भोसले घराण्यात आल्या. त्यांनी मराठा साम्राज्यातील खूप मोठा संघर्षाचा काळ पाहिला आणि त्याचा एका सच्चा योध्याप्रमाणे मुकाबलाही केला. राजाराम महाराजांचे अकाली निधन झाल्यावर मराठा साम्राज्याची सूत्र महाराणीकडे आली. त्यांनी मुघलांशी निकराचा लढा देत मराठा सिंहासनाचे रक्षण केले. त्यांना खूप मोठ्या गृहयुध्दालाही सामोरे जावे लागले. मात्र त्या डगमगल्या नाहीत. करवीर संस्थान स्थापन करणाऱ्या या महापराक्रमी महाराणीनी इतिहास खऱ्या अर्थाने घडवला.



       ताराराणींची ही संघर्ष गाथा इतिहासात फारशी सांगितली जात नाही. अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी ताराराणींची शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहीत असायलाच हवी. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत  आयोजित करण्यात आलेल्या ७ शिवव्याख्याना आबाल वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे हे ८ वे पुष्पदेखील ऐतिहासिक राजवाड्याच्या
सिंधुदुर्गवासीयांच्या गर्दीने बहरणार आहे. त्यामुळे एका लढवय्या राणीचा, तिच्या शौर्याचा पराक्रमाचा इतिहास सखोल समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने डॉ प्रविणकुमार ठाकरे व सीए लक्ष्मण नाईक यांनी आवाहन केले आहे.
     
फोटो डॉ शिवरत्न शेटे

डॉ शिवरत्न शेटे महाविद्यालयीन जीवनापासून शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून व्याख्याने देत आहेत. आपल्या ओघवत्या वाणीच्या शिव व्याख्यानातून प्रत्यक्ष शिवसृष्टी उभारण्याचे कसब त्यांच्यात आहे. समकालीन बखरीसह इतिहासाचार्यांच्या भेटी व त्यांच्या लेखनाचा त्यांना अभ्यास असुन राजे प्रत्यक्ष ज्या ज्या भागात व ज्या ज्या मार्गाने गेले त्याचाही त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी जुलै महिन्यात हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पन्हाळा ते पावनखिंड तर हिवाळ्यात विविध गडकिल्ल्यांवर अशा दोन मोहिमा आयोजित केल्या जातात. तसेच शेतकरी आत्महत्या प्रबळ भागात शिवचरित्राच्या माध्यमातून संकटांचा सामना कसा करावा याबाबत व्याख्याने देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद जागवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *