आताच शेअर करा

सिंधुदुर्ग संपादकीय

दिनांक:२४ डिसेंबर २०२४

अनिल जिजाबाई कांबळे सरमळकर लिखीत
‘एनिमी ऑफ अमेरिका’ या  पुस्तकाचे प्रकाशन २५ डिसेंबर २०२४ रोजी ख्रिसमसच्या पवित्र पार्श्वभूमीवर थेट अमेरिकेत न्यूयॉर्क मॅनहॅटन येथे ब्रॉडवे बुक्स या प्रख्यात प्रकाशनाच्या वतीने होत आहे त्यानिमित्त  कोकणचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी लेखक नाटककार दिग्दर्शक अनिल जिजाबाई तुकाराम कांबळे यांच्याशी कोकण व्हिजन साधलेला थोडक्यात संवाद
…………………………..

प्रश्न :  तुमचे Enemy Of America हे पुस्तक थेट अमेरिकेत प्रकाशित होत आहे त्या बद्दल तुमचे अभिनंदन ! ही एकुण प्रक्रीया कशी होती ?

**  परदेशात प्रसिद्ध होणारे हे माझे दुसरे पुस्तक आहे. The fox हे माझे नाटक बहुचर्चित ठरले आणि त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात घेण्यात आली व ते पुस्तक प्रथमच इंग्लंड येथील Matchword press या लंडन येथील प्रकाशनाने प्रकाशित केले
त्यानंतर काही इतर आंतरराष्ट्रीय प्रकाशकांशी माझा संपर्क झाला. त्यामध्ये अमेरिका न्यूयॉर्क येथील  स्वतंत्र प्रकाशन व्यवसायातील प्रकाशक ॲंथनी मॉरिस यांच्याशी माझी तीन वर्षांपूर्वी ओळख झाल्यावर त्यांना मी Enemy of America ची वर्ड फाईल पाठवीली.दीर्घ काळ विचार चर्चा आणि संपादन झाल्यावर त्यांनी पुस्तक प्रकाशित करण्यास होकार दिला. आता पुस्तक लवकरच अमेरिकेत उपलब्ध होइल. तर भारतातील आवृत्ती आम्ही स्वतंत्रपणे येथील प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करणार आहोत त्याला बराच अवधी लागणार आहे अद्याप.

प्रश्न : अत्यंत प्रतिकूल काळ व परिस्थितीतुन तुम्ही एकाकी इथवर कसे  आलात? आणि तुम्ही इंग्रजीच लिहायचा निर्णय का घेतला व इंग्रजीवर कशी पकड निर्माण केली ? त्याबद्दल थोडक्यात सांगा.

** माझ्यासाठी सगळच आजुबाजुचे सामाजिक भवताल भयंकर विपरीत होते. आई बाबांनी माझ्या शिक्षणासाठी काही कमी केले नाही. मराठी माध्यमातून शिकत असताना मी महाविद्यालयीन शिक्षण घेताना इंग्रजी स्पेशल विषय निवडला होता. लेखनाच्या जाणीवा अगदी मराठी शाळेत असतांनाच माझ्यात निर्माण झाल्या.मी मराठीत खुप लिहिले आहे मात्र इंग्रजी शिकत असतांना इंग्रजी भाषा व इंग्रजी साहित्याचा अक्षरशः ध्यास घेतला. इंग्रजी भाषा परकीय आहे तरीही ती शिकायची असेल तर आधी आपली मातृभाषा खुप सशक्त असायला हवी. मी मराठी हिंदी खुप वाचतो आणि त्यापेक्षा इंग्रजी खुप अधिक वाचतो आणि निरंतर या तिन्हीही भाषा मी सतत स्वताला शिकवित असतो त्यात कधीही खंड पडत नाही आणि या तिनच भाषा मला येतात त्याही खुप चांगल्या येतात   असे आजही मला वाटत नाही.
मी या भाषा सतत शिकत राहणार एवढे निश्चित.
हे खरं आहे की आई बाबा सोडले तर या प्रवासात माझ्या बाजुने कधीही कुणीही नव्हते आजही नाहीत. उलट माझ्या या सामाजिक साहित्यिक रंगभूमी आणि तत्वज्ञानाच्या प्रवासात जाणूनबुजून नेहमीच अडचणी निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती विकृतीच आधिक होत्या व आजही कायम आहेत.
महाकवी संत ज्ञानदेव हे माझं आद्य प्रेरणास्थान आहे आणि त्यानंतर मग सारं वैश्विक साहित्य कला संगीत रंगभूमी तत्वज्ञान इत्यादी.

खरी सुरुवात The fox या नाटकाने केली ज्यामुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळु लागली. त्यानंतर आलेल्या  Its Already Tomorrow ‘ या माझ्या नाटकाची विशेषता समीक्षक बुद्धीवंत व जागतिक विद्यापीठातुन दखल घेतली गेली आहे व अलिकडेच प्रकाशित झालेले Death of Arts हे वैचारीक पुस्तक सध्या वाचनाधिन आहे.

Enemy Of America हे वेगवेगळ्या forms मधुन लिहिलेले अपारंपरिक लेखन आहे. हा लेखनातील एक धाडसी प्रयोग आहे. पहायचे आहे कसा प्रतिसाद मिळेल.
मी इंग्रजीची निवड करण्यामागे असा फार काही ठरवूनच घेतलेला निर्णय असे नाही परंतु इंग्रजीतुन व्यक्त होता येइल का असा तो प्रयोग होता आणि त्यानंतर प्रस्थापित मराठी व दलित बहुजन साहित्यातील काही संकुचित प्रवाह गट कळप यांनी सातत्याने जाणीवपूर्वक माझी अवहेलना केल्याचे स्पष्ट झाल्यावर पुढील लेखन इंग्रजीतुच करावे असा निर्णय मी घेतला.

प्रश्न : सुरुवातीला तुम्ही मराठीत विपुल दर्जेदार लेखन केले आहे
आता तुम्ही मराठीत लिहावे असे अनेकांना वाटत आहे. तुम्ही पुन्हा मराठीत लिहिणार का ?

**  सर मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपली आईच ती ! तीच्यावर कसला राग ? राग आहे तो मराठी साहित्य आणि सांस्कृतीक क्षेत्रात दिवसेंदिवस फोफावणाऱ्या अत्यंत संकुचित वृत्ती.व दर्जाहीन लोक वाढत आहेत आणि आता हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्र काही अपवाद वगळता राजकारणी जसे आपापले गट तयार करतात व वशीले लाऊन सवंग लोकांना पुढे करतात तसे हे क्षेत्र अत्यंत खालच्या पातळीवर आले आहे. इथे गट कळप जातीपाती सारं काही चालते म्हणुनच या असाहित्यिक व असांस्कृतिक वातावरणापासुन दुर रहता येइल तितके मी चांगले समजतो.

मला जेव्हा कधी जाणवेल नैसर्गिकरीत्या प्रकर्षाने की मला जी कलाकृती निर्माण करायची आहे ती माझ्या मातृभाषेतुनच निर्माण करायची तेव्हा मी निश्चितच मराठीतुन लिहिनच आणि मला हिंदीही लिहायचे आहे शक्य झाल्यास,मात्र मी सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे माझा सर्वात जास्त भर आहे व असेल तो इंग्रजीवरच,जी भाषा मी रोज स्वताला शिकवित असतो.

प्रश्न : Enemy Of America चा सारांश काय आहे ?

** ते मी सिक्रेटच ठेवेन परंतु या पुस्तकात वेगवेगळे साहित्यबंध एकत्र आले आहेत. या लेखनाचा अंतस्थ स्वर निश्चित असला तरी ते लेखन पोस्ट मॉडर्न शैलीतील आहे त्यात लेखन विचार इत्यादिची विखंडितता महत्वाची आहे. हे लेखन खरोखरीच अमेरिकेबद्द्ल आहे का ? त्यामध्ये अमेरिकेवर टिका आहे का ? की अमेरिकन वैभवशाली भौतिक सामर्थ्याचे कौतुक आहे ? किवा हे लेखन आजिबात अमेरिकेबद्दल नाही ? हे लेखन कादंबरी आहे की अकादंबरी की अनाट्य ? की दीर्घकाव्य आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच हे पुस्तक देणार आहे..

प्रश्न : शेवटी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन. कदाचित तुम्ही कोकणातील पहिलेच लेखक असाल ज्यांची इंग्रजी पुस्तके आंतरराष्ट्रीय प्रकाशक प्रकाशित करीत आहेत. तुम्ही आजच्या समाजाला काय संदेश द्याल ?

** धन्यवाद सर. हो मी कदाचित कोकणातील पहिलाच इंग्रजी लेखक असेन ज्याची पुस्तके आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित होत आहेत. मी समाजाला काय संदेश देणार ? गेली वीस वर्षे मी लेखक म्हणुन सार्वजनिक जिवनात वावरत असताना सामाजिक स्थित्यंतरे पाहत आहे आणि समाजाचे चांगले व वाईट रुपही पाहत आहे. आजचा समाज एखाद्या व्यक्तीसारखा अनेक पर्सनॅलिटिज मध्ये विखंडित झाला आहे,विभागला गेला आहे. तो अस्थिर आहे असहाय्य आहे अगतिक आहे आणि क्षणात तो प्रचंड आक्रमक आणि प्रचंड उत्साही आहे क्षणात त्याला वाटते आपण सुखी आहोत आपण ज्ञानी आहोत आणि क्षणात त्याला कधीतरी त्याला कळतं की आपण एक नथिंग आहोत…

आजची ही अवस्था आजच्या भीषण राजकीय व अर्थव्यवस्था धर्मव्यवस्था व शिक्षणव्यवस्थेने निर्माण केली आहे. समाजाला या चक्रातून बाहेर येणे हे आपण समजतो तितके सोपे नाही. जी सर्व प्रकारची सत्ता आपल्याला जखडून आहे ती इतक्या लवकर इतक्या सहसा या आजच्या मानवी समाजाची सुटका करणार  नाही. थांबावे लागेल एका नव्या  काळासाठी तोवर…

लेखक: अनिल जिजाबाई कांबळे सरमळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *